CoronaVirus : बॅरिकेटिंग,परप्रांतांच्या सीमा तातडीने सील; नांदेड जिल्ह्यात आळंदी पॅटर्नने लोंढे रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 08:21 PM2020-04-09T20:21:31+5:302020-04-09T20:23:22+5:30
तीन राज्याच्या सीमासह विदर्भाची सीमा नांदेडला लागून
नांदेड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे़ नांदेड जिल्ह्याच्या सर्व सीमाही सील करण्यात आल्या आहेत़ आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यासह शेजारील विदर्भाच्या सीमा नांदेड जिल्ह्याला लागून आहेत़ त्यामुळे या ठिकाणाहून येणारे नागरिकांचे लोंढे रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते़ पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यासाठी आळंदी पॅटर्न राबविला़ त्यानंतर हा पॅटर्न राज्यातील अनेक जिल्ह्यांत राबविण्यात आला़ त्यामुळे नांदेडात येणाऱ्या लोंढ्यांना रोखण्यास यश मिळाले.
देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना नांदेडात मात्र आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ नांदेड जिल्ह्याला लागूनच तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक यासह विदर्भाच्या सीमा आहेत़ या ठिकाणी नांदेडकरांचा रोटी-बेटीचा व्यवहार चालतो़ त्यामुळे नांदेडात येणाºयांची संख्या मोठी आहे़ लॉकडाऊन झाल्यानंतर या भागातून येणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली़ या लोंढ्यामुळे नांदेडकरांना मात्र धोका होवू शकतो हे वेळीच ओळखून तातडीने सर्व सीमा सील करण्यात आल्या़ त्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचा आळंदी येथील अनुभव कामी आला़ आळंदी पॅटर्ननुसार त्यांनी चाळीस ठिकाणी बॅरिकेटींग लावली़ त्यात प्रामुख्याने सापशिडी बॅरिकेट, फिक्स पॉर्इंट, आंतरराज्य चेकपोस्ट, ड्रोन कॅमे-यांद्वारे लक्ष यांचा समावेश होता़ जनतेला होणारी गैरसोय, राजकीय मंडळींनी केलेली टिप्पणी या सर्व अडचणींवर यशस्वीपणे तोडगा काढून लॉकडाऊनची अमंलबजावणी करण्यात येत आहे़ हे करीत असताना अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही़ याचीही खबरदारी घेण्यात आली़ नांदेड जिल्ह्यात केलेल्या या प्रयोगाचे अनेक जिल्ह्यांनी अनुकरण केले़
लढाई अजून संपली नाही़़़
लॉकडाऊनच्या काळात नांदेडकरांनी खूप सहकार्य केले आहे़ अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत़ जे विनाकारण बाहेर पडत आहेत़ त्यांच्याविरोधात कारवाई सुरु आहे़ नांदेडात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ ही समाधानाची बाब आहे़ परंतु लढाई अजून संपली नाही़ त्यामुळे गाफील न राहता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे़ पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यासाठी आळंदी पॅटर्न राबविला़ त्यानंतर हा पॅटर्न राज्यातील अनेक जिल्ह्यांत राबविण्यात आला़ त्यामुळे नांदेडात येणाऱ्या लोंढ्यांना रोखण्यास यश मिळाले़