CoronaVirus : नांदेडमध्ये कोरोना निगेटिव्हच ; चीन, अमेरिकेसह परतलेत शहरात प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 06:47 PM2020-04-06T18:47:45+5:302020-04-06T18:49:35+5:30
आजघडीला तरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण नाही
- अनुराग पोवळे
नांदेड : चीनमधीलच शांघाय शहरातून आलेल्या एका प्रवाशाचा २५ जानेवारीला कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नांदेडमध्ये पहिला स्वॅब घेतल्यानंतर चीनसह अमेरिका, आॅस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, इजिप्त, इंडोनेशिया, रशिया, सौदी अरेबिया यासह इतर देशांतून आलेल्या नागरिकांसह जिल्ह्यातील इतर संशयित रुग्णांचे कोरोनाचे आतापर्यंतचे अहवाल निगेटिव्हच आले आहेत़ त्यामुळे एकूणच ११६ पैकी १११ अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यात नांदेडकर आतापर्यंत तरी यशस्वी झाले आहेत़
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० च्या दुस-या आठवड्यापासून प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे़ जिल्ह्यात १३ मार्च रोजी कोरोना रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला़ त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ़विपीन इटणकर यांनी वेगवेगळे आदेश, परिपत्रक, सूचना काढून या कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या़ राज्य व केंद्र शासनानेही वेगवेगळे आदेश दिले़ या आदेशाची अंमलबजावणीही प्रभावीरित्या जिल्ह्यात करण्यात आली आहे़
कोरोनाचा संशयिताचा जिल्ह्याचा इतिहास पाहता पहिल्या संशयिताची चाचणी कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमधीलच शांघाय शहरातून आलेल्या एका व्यक्तीची करण्यात आली़ २५ जानेवारी २०२० रोजी शांघायमधून परतलेल्या त्या इसमाचा स्वॅब आरोग्य विभागाने घेतला आणि तो तपासणीसाठी पाठविला़ २७ जानेवारी रोजी त्या संशयिताचा अहवाल प्राप्त झाला, तो निगेटिव्ह आला़ त्यानंतर बहेरिन येथून आलेल्या एका प्रवाशाचाही फेब्रुवारीमध्ये स्वॅब घेण्यात आला़ तो अहवालही निगेटिव्हच आला होता़ त्यानंतर जगभरात कोरोनाचा उद्रेक झाला़ जगातून अनेक प्रवासी आपापल्या घरी परतू लागले़
सौदी अरेबिया या देशातून ७ मार्च २०२० रोजी नांदेडमध्ये परत आलेल्या ४९ व्यक्तींची कोविड-१९ अर्थात कोरोनाची तपासणी करण्यात आली़ पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू तपासणी प्रयोगशाळेत या सर्व तपासण्या करण्यात आल्या़ आरोग्य विभागाने या सर्व ४९ व्यक्तींला २८ दिवस होम क्वॉरंटाईन केले होते़
त्यांनतर १३ मार्चपासून जिल्हाभरात पुण्या, मुंबईसह इतर शहरातून येणाºया नागरिकांची संख्या वाढली़ १३ मार्चनंतर जवळपास १०५ संशयितांचे स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत़ दिल्लीच्या निझामुद्दीन मरकज येथून परतलेल्या १६ संशयितांचीही तपासणी आरोग्य विभागाने केली आहे़ सुदैवाने हे रिपोर्टही निगेटिव्हच आले आहेत़ या सोळाही जणांना २८ दिवस होम क्वॉरंटाईन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ विपीन इटणकर यांच्यासह पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ नीळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़ सचिन खल्लाळ यांच्यासह संपूर्ण यंत्रणाही रात्रंदिवस झटत आहे़ जिल्हा प्रशासनाने पुणे, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, सांगली, औरंगाबाद यासह इतर शहरांतून आलेल्या नागरिकांचे घरोघर सर्वेक्षण केले़ आरोग्य कर्मचाºयांनी आतापर्यंत केलेल्या या सर्वेक्षणात ६४ हजार ३०५ व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे़
या सर्व लोकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना घरातच अर्थात होम क्वॉरंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ ग्रामीण भागात गावकरी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांच्या सहकार्याने या होम क्वॉरंटाईन नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे नोडल आॅफिसर डॉ़ बालाजी शिंदे यांनी सांगितले़ जिल्ह्याबाहेरुन परतलेल्या नागरिकांना आरोग्याबाबत काही तक्रारी असल्यास किंवा कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची तात्काळ तपासणी करुन स्वॅब पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत़ त्यामुळे एकूणच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात जिल्हा प्रशासनाला आतापर्यंततरी यशच आल्याचे दिसत आहे़ आतापर्यंत ११६ नमुने जिल्ह्यातून पाठविण्यात आले होते़ त्यातून १११ नमुने हे निगेटिव्ह आले आहेत़ तर ५ नमुने तपासणीसाठी नाकारले़ ५ एप्रिल रोजी पुन्हा १२ नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत़ जिल्हाभरात अडकलेल्या इतर राज्य, जिल्ह्यांतील नागरिकांची प्रशासनाने व्यवस्था केली आहे़ तसेच त्यांंच्या आरोग्यासाठी प्रशिक्षकांकडून योगा अभ्यास करुन घेतला आहे़ तर मानसिक स्वास्थ्यासाठी प्रकल्प प्रेरणाकडून समुपदेशनही केले जात आहे़ प्रशासनाच्या या उपक्रमांमुळे जिल्हा आजतरी कोरोनामुक्तच दिसत आहे़
धोका कायमच, खबरदारी गरजेची- डॉ़विपीन
जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, ही समाधानाची बाब आहे़ पण त्याचवेळी धोका अजूनही टळला नाही़ त्यामुळे प्रत्येक नागरिकाला खबरदारी घेणे गरजेचे आहे़ प्रशासन देत असलेल्या सूचना या समाजासाठीच आहेत़ त्यामुळे त्यांचे पालन करुन जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी़ नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ विपीन इटणकर यांनी सांगितले़ जिल्ह्यात पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे़ हा बंदोबस्त कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच लावण्यात आला आहे़ पोलिसांना सहकार्य करणे म्हणजे स्वत:ला, कुटुंबीयाला व समाजाला हे सहकार्य राहणार आहे़ कोरोनामुक्त राहण्यासाठी आगामी काळातही जिल्हावासियांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले़