coronavirus : मुखेडला कोरोनाने पुन्हा घेरले;२४ तासात ९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:16 AM2020-06-16T10:16:24+5:302020-06-16T10:19:03+5:30
नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे.
नांदेड : मुखेड तालुक्यात २४ तासात तब्बल नऊ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी पहाटे पाच आणि मध्यरात्री आलेल्या अहवालामध्ये चार रुग्ण बाधित आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर मुखेड येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोरेानामुक्त झालेल्या मुखेड तालुक्याला पुन्हा कोरोना विषाणूने गाठले आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यातील ११८ रुग्णांच्या नमून्यांचा अहवालसमोर आला. त्यापैकी चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १११ अहवाल निगेटीव्ह आले आणि ३ अहवाल नाकारण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांमध्ये मुखेड तालुक्यातील पाखंडी येथील ५० वर्षीय महिलेचा ही समावेश असून तर तिघे विठ्ठल मंदिर परिसरातील आहेत. हे सर्व रुग्ण यापूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २६६ झाली आहे. मुखेडमधील बाधित रुग्णांमध्ये एका डॉक्टरांसह व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
नांदेड शहराला दिलासा
दरम्यान, शनिवारी नांदेड शहरात २२ बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी तब्बल २० जण हे एकाच बँकेचे कर्मचारी होते. तसेच सर्व जण शहराच्या विविध भागातील रहिवासी असल्याने नांदेडकरांची चिंता वाढली होती. मात्र रविवारी शहरातील बरकतपुरा भागात केवळ एक रुग्ण बाधित आढळला तर सोमवारी रात्रीच्या अहवालात ११८ पैकी तब्बल १११ अहवाल निगेटिव्ह आले.