CoronaVirus : अहवाल निगेटीव्ह तरीही मृत्यूने गाठलेच; नांदेडमधील ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 04:39 PM2020-04-30T16:39:20+5:302020-04-30T16:40:21+5:30
कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही गुरुवारी दुपारी दीड वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्च चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी सांगण्यात आले.
नांदेड : जवळपास महिनाभर कोरोनामुक्त असलेल्या नांदेड शहरात पिरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय नागरिक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. या बाधित नागरिकाला इतरही विविध आजार होते. या इतर गंभीर आजाराने या रुग्णाचा पिच्छा सोडला नाही. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही गुरुवारी दुपारी दीड वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्च चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी सांगण्यात आले.
या ६४ वर्षीय रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाने नांदेडमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर पिरबुºहाणनगर परिसर प्रशासनाने पुर्णत: सील करीत तीन कि.मी. परिसर कंटेनमेन्ट झोन म्हणून घोषित केला होता. २०० आरोग्य कर्मचाºया मार्फत ३ कि.मी. परिसरातील ५० ते ६० हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणीही सुरु करण्यात आली. कोणताही प्रवास न केलेल्या या ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग नेमका कोणापासून झाला याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे होते. कोरोना बाधित व्यक्तीचे कुटुंबीय सदर व्यक्ती गेल्या दोन महिन्यापासून घरामध्येच असल्याचे सांगत होते. या बाधितास मधुमेह, अस्थमा आदी आजार होते. या आजाराचे उपचार केले जात होते. मागील आठ दिवसात त्यांनी शहरातील पिरबुºहाणनगर येथे आणि सहयोग नगर येथील एका रुग्णालयात उपचारही घेतले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने ते पुन्हा खाजगी रुग्णालयात गेले होते. मात्र, त्यांना सदर खाजगी रुग्णालयाने शासकिय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार २० एप्रिल रोजी ते नांदेड येथील शासकिय रुग्णालयात दाखल झाले. येथे त्यांचा तातडीने स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर सदर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील जवळपास १४ व्यक्तींना प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांचे स्वॅब तपासणी अहवालही निगेटीव्ह आले. पाठोपाठ या रुग्णाचाही पहिला अहवाल निगेटीव्ह आल्याने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र इतर आजाराशी झुंज देत असतानाच गुरुवारी दुपारी या ६४ वर्षीय व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले.