coronavirus : कोरोना संशयित सापडल्याची अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 07:29 PM2020-03-18T19:29:32+5:302020-03-18T19:31:22+5:30
फोटोशॉपच्या माध्यमातून तयार केलेली पोस्ट व्हॉट्सअॅपवर केली व्हायरल
नांदेड : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाबत समाजमाध्यमांवर कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ तरीही व्हॉट्सअॅप, फेसबुकवर वृत्तवाहिन्यांच्या लोगोचा वापर करुन अफवा पसरविण्यात येत आहेत़ नांदेडातील सिडको परिसरात मंगळवारी दोन संशयित सापडल्याची अफवा पसरविण्यात आली़ त्याची पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संशयित चार रुग्ण आढळले होते़ परंतु या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ आजघडीला शासकीय रुग्णालयात कोरोना संशयित एकही रुग्ण नाही़ त्यामुळे घाबरण्याचे कारण नसले तरी, नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ तसेच सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे़ दरम्यान, मंगळवारी एका वृत्तवाहिनीच्या लोगोचा वापर करुन फोटोशॉपच्या माध्यमातून सिडकोत दोन संशयित आढळले अशा आशयाच्या ब्रेकींग न्यूजचा फोटो काढून तो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला़ त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती़ त्याचप्रमाणे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील गंगाखेड व मानवत येथेही कोरोनाचे रुग्ण आढळल्याची अफवा पसरविण्यात आली़ या प्रकरणात वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत़
अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे़ परंतु काही जण खोडसाळपणा करुन कोरोनाचे संशयित असल्याच्या अफवा पसरवित आहेत़ नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये़ अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे़