CoronaVirus : ग्राहकांनी गर्दी केल्याप्रकरणी उमरीत तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 03:59 PM2020-04-18T15:59:17+5:302020-04-18T15:59:25+5:30
अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने उघडण्यात आली
उमरी : कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करून दुकानासमोर ग्राहकांची गर्दी केल्याप्रकरणी उमरी शहरातील तीन दुकानदारांवर १८८ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील अत्यावश्यक किराणा सामान, दुध , भाजीपाला , अन्य जिवनावश्यक वस्तु व औषधालय वगळुन बंद ठेवण्याबाबत सर्व व्यापारी प्रतिष्ठानांना आदेशित करण्यात आले आहे. परंतु उमरी शहरातील कबीरदास सिंगनवाड यांचे श्री साई स्टील सेंटर, देविदास सुर्यवंशी यांचे मदने शुज सेंटर व बाशुमियाँ स्टील सेंटरचा मालक यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघण करुन १७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ वाजताच्या दरम्यान आपले दुकान चालु ठेवुन दुकानावर अनावश्यक गर्दी केली. तसेच सोशल डिस्टन्सींगचा भंग केल्याने त्यांच्या विरुध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कलम ५१ ब व भा.दं.वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला .
उमरी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारे नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर अत्यावश्यक काम असल्यास ,कोणीही तोंडावर मास्क न घालता घराहेर पडु नये. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणते आस्थापना , दुकाने उघडून विनाकारण गर्दी केल्याचे निदर्शनास आल्यास वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.
सदर कार्यवाहीमध्ये मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी अर्जुन गव्हाणे, नगर अभियंता संतोष मुंढे, वरिष्ठ लिपिक सचिन गंगासागरे, गणेश मदने, माधव जाधव , चंद्रकांत श्रीकांबळे, शंकर माने आदींनी सहभाग घेतला होता.