coronavirus : आनंदवार्ता ! नांदेडमध्ये कोरोनाच्या विळख्यातून २६ जण मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 08:23 PM2020-05-14T20:23:16+5:302020-05-14T20:28:37+5:30
शहरातील पंजाब भवन कोवीड केअर सेंटरमधून सोडण्यात आलेल्या २२ रुग्णांपैकी १९ रुग्ण हे पंजाबमधील, एक रुग्ण चंदीगडमधील तर दोन रुग्ण हे स्थानिकचे होते.
नांदेड : कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून नांदेडमधून २६ जण मुक्त झाले असून गुरुवारी २५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले तर यापूर्वी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले होते. शहरातील पंजाब भवन कोवीड केअर सेंटरमधून सोडण्यात आलेल्या २२ रुग्णांपैकी १९ रुग्ण हे पंजाबमधील, एक रुग्ण चंदीगडमधील तर दोन रुग्ण हे स्थानिकचे होते. या रुग्णांना कोणतेही लक्षणे नसल्याने केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनूसार घरी सोडण्यात आले आहे.
शहरातील पंजाबभवन कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना गुरुवारी दुपारी ४.३० च्या सुमारास कोरोनामुक्त घोषित करुन घरी सोडण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या २२ रुग्णांना पुष्प देवून घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये १९ रुग्ण हे पंजाबमधील होते. एक चंदीगडचा तर दोन स्थानिक रहिवासी होते. या सर्व रुग्णांना आवश्यक त्या सूचनांसह ७ दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोनाचे विषाणू हे सात दिवसात नष्ट होतात. दहा दिवसानंतर कोरोना रुग्णांपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाहीसा होतो. त्यामुळे अशा रुग्णांना घरी सोडण्यास हरकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याच सूचनानुसार नांदेडमध्ये या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पंजाबमधील भाविक कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. लंगर साहिब येथील जवळपास २४० भाविकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १५ ते २० जणांना कोरोनाची लागण झाली होती. उर्वरीत सर्व जण कोरोना निगेटिव्ह होते. उर्वरीत सर्वांचीच तपासणी केली जात असून एकूण तपासणीतील पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण पाहता मोठ्या प्रमाणात रुग्ण असतील ही भीती आता दूर झाली आहे. महापालिकेच्या पथकाकडून श्री लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. पहिल्या टप्प्यात २० रुग्ण आढळल्याने भीती वाढली होती. महापालिका आयुक्त डॉ. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लंगर साहिब गुरुद्वारा परिसराला कन्टेन्टमेंट झोन घोषित करुन आवश्यक ते सर्व सर्व्हेक्षण तसेच या भागात ये-जा करण्यास बंदी घातली. श्री लंगर साहिब गुरुद्वारात अडकलेले सर्व २४० भाविक यांच्यासह गुरुद्वाऱ्याच्या सर्व स्थानिक कर्मचाऱ्यांचेही कोरोनाच्या अनुषंगाने स्वॅब घेण्यात आले. स्वॅब घेण्याचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन यांनी सांगितले.
निगेटिव्ह यात्रेकरुंना सोडण्याचा प्रश्न कायम
श्री लंगर साहिब गुरुद्वारातून पंजाबमध्ये जवळपास ४ हजार यात्रेकरुंना सोडण्यात आले आहे. असे असले तरीही आणखी जवळपास २५० भाविक हे गुरुद्वाऱ्यात अडकून पडले आहेत. नांदेड जिल्हा प्रशासनाने या सर्वांची कोरोना टेस्ट घेतली आहे. यातील बहुतांश यात्रेकरु हे निगेटिव्ह आले आहेत. जे यात्रेकरु पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यावर उपचार केल्यानंतर तेही निगेटिव्ह झाले आहेत. अशाच २० रुग्णांना १४ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता निगेटिव्ह असलेल्या भाविकांना त्यांच्या मूळ राज्यात सोडण्याबाबत हालचाली आवश्यक आहेत. यामध्ये संबंधित राज्याकडून परवानगी दिली जात नसल्याने यात्रेकरुंना सोडण्यामध्ये अडचणी येत आहेत. पण आता या सर्व यात्रेकरुंचे कोरोना निगेटिव्ह अहवाल असतांना त्यांना परत घेण्यात त्या राज्यांना कोणती अडचण आहे? हाही प्रश्नच आहे.