coronavirus : नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख ज्येष्ठांचे आरोग्य स्क्रीनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:00 PM2020-06-19T12:00:13+5:302020-06-19T12:15:43+5:30

कोरोना आजारामध्ये वयस्कर व्यक्ती, हृदयरोग,  उच्च रक्तदाब, मधुमेह असणारा व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण जास्त असल्याची बाब पुढे आली आहे.

coronavirus: Health screening of five and a half lakh senior citizens in Nanded district | coronavirus : नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख ज्येष्ठांचे आरोग्य स्क्रीनिंग

coronavirus : नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख ज्येष्ठांचे आरोग्य स्क्रीनिंग

Next

नांदेड : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य स्क्रीनिंग करण्यात येत असून हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने राष्ट्रीय असांसर्गिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रमांतर्गत हे आरोग्य स्क्रीनिंग करण्यात येत असून आजघडीला ५ लाख ५० हजार ७८४ व्यक्तींची नोंदणी करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.

कोरोना आजारामध्ये वयस्कर व्यक्ती, हृदयरोग,  उच्च रक्तदाब, मधुमेह असणारा व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण जास्त असल्याची बाब पुढे आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने राष्ट्रीय असांसर्गीक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रमांतर्गत आशा, आरोग्य कर्मचाºयामार्फत सर्व्हेक्षण आणि समुदाय आरोग्य अधिकाºयामार्फत स्क्रीनिंग करण्यात येत आहे. जिल्ह्यात असलेल्या सुमारे १० लाख ९८० व्यक्तीपैकी आजपर्यंत ५ लाख ५० हजार ७८४ व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे.  यामध्येही ३० वर्षापेक्षा जास्त वय असलेले ४ लाख ३३ हजार १३१ व्यक्ती आहेत. उर्वरीत साडेचार लाख व्यक्तींची नोंदणीही जून २०२० अखेर सर्व्हेक्षणाद्वारे पूर्ण केली जाईल, असेही डॉ. शिंदे म्हणाले.

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आखण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील २६ लाख जनतेला आरोग्याच्या सेवा देण्यासाठी जि.प. आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास दीड लाख व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून आले आहेत. त्यापैकी १ लाख १६ हजार १९२ जणांचा होम क्वारंटाईन कालावधी संपला आहे. आता ३१ हजार ५८९ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. बाहेरुन आलेल्या व्यक्तीस किंवा कोरोनाची लक्षणे आढळलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेवूुन त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच्या संपर्कातील सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.  कोरोना संदर्भात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असून ग्रामस्थही सतर्क आहेत. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना ग्रामपंचायतीमार्फत चौदाव्या वित्त आयोगामधून आरोग्य साहित्य खरेदी करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी दिली आहे. त्या परवानगीनुसार कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा देताना कोणतीही उणीव भासणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात असल्याचे डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात ग्रामीण भागाशी निगडीत २० कोविड केअर सेंटर असून या ठिकाणी रुग्णांचे स्वॅब घेवून त्यांचेवर उपचार केले जात आहे.  


रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत १९ दिवसाचा
जिल्ह्यात एक दशलक्ष लोकसंख्येमागे तपासणीचे प्रमाण १ हजार ४०१ इतके आहे. तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर ५.३ टक्के इतका आहे. मृत्यू दर हा ४.५ टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचा दर ६३ टक्के आहे. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १९ दिवसांचा आहे. ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली २११ वैद्यकीय अधिकारी, ४१८ आरोग्य सेविका, २३९ आरोग्य कर्मचारी, १८० आरोग्य पर्यवेक्षक तसेच १ हजार ५०० आशा यांच्यासह इतर आरोग्य कर्मचारी असे २ हजार ५५० आरोग्य अधिकारी, कर्मचारी कोविड योद्धा म्हणून जिल्ह्यात कामगिरी करीत आहेत.

Web Title: coronavirus: Health screening of five and a half lakh senior citizens in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.