CoronaVirus : कलेच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात; नांदेडची लेक पुण्यातून करतेय सुरेख काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:39 PM2020-04-09T12:39:36+5:302020-04-09T12:42:08+5:30
फोटो स्केच करून मिळविलेल्या पैशातून पुणे, नांदेड, हिंगोलीत करणार मदत
- श्रीनिवास भोसले
नांदेड : ‘कोरोना’मुळे पुणे येथे वसतीगृहातच अडकलेल्या नांदेडच्या कन्येने आपल्या कलेच्या माध्यमातून पैसे कमावून त्यातून गोरगरीबांपर्यंत धान्य पुरविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ त्यास नेटीझन्सकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे़
नांदेड येथील पाली नगरच्या अर्टिस्ट रेखा अशोक गायकवाड ही सध्या पुणे येथे खासगी कंपनीत कर्तव्यावर आहे़ तिच्यातील कलेने प्रत्येकजण मोहित होतो़ हातात साधा पेन घेवून कागदावर फिरवला तरी आकर्षीत करणारी कलाकृती निर्माण करण्याची धमक तिच्यात आहे़ यातूनच तिने साकारलेल्या चित्र, पेंटीग सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत़ दरम्यान, पुण्यात नोकरी करत असताना सध्या लॉकडाऊनमुळे ती एका वसतीगृहात अडकली आहे़ अशा वेळेचा सदुपयोग समाजासाठी व्हावा या उद्दात हेतूने तिने सोशल मिडियावर आवाहन केले आहे़ शंभर रूपयांमध्ये ती एक फोटो स्केच करून तुम्हाला देणार आणि त्यातून मिळणारे शंभर रूपये हे धान्य खरेदी करण्यास उपयोगात आणणार, असा निर्धार रेखा गायकवाड हीने केला आहे़ तिच्या आवाहनास प्रतिसाद देत अनेकांनी तिच्या खात्यात पैसे जमा केले असून ती या रक्कमेतून तांदूळ, तेल, पीठ व इतर साहित्य खरेदी करून त्याच्या कीट बनविणार आहे़ त्यात स्वत:च्या पगाराचेही काही पैसे टाकणार आहे़
साधा स्केच काढण्यासाठी दोन ते पाच तासांचा वेळ लागतो़ हे जीकरीचे काम करण्याचे आव्हान रेखा गायकवाड हीने स्विकारून गरीबांसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे़ सदर स्केच आठ दिवसांमध्ये ती संबंधीत व्यक्तीला देणार आहे़ रेखा गायकवाड हीने तिच्या अर्टिस्ट रेखा गायकवाड या फेसबुक पेजवर या सामाजिक उपक्रमाचे सर्व डिटेल्स टाकले आहेत़ त्याचबरोबर तिला या माध्यमातून मिळणाºया पैशाचा हिशोब आणि केलेल्या मदतीचे रेकॉर्ड ठेवण्यासाठीदेखील गायकवाड हीने एक आॅनलाईन फॉर्म तयार केला असून देणगीदाराकडून तो अर्ज ती आॅनलाईन भरून घेत आहे़ तिच्या या सामाजिक दायित्वातून गोरगरीबांना होणाऱ्या मदतीत आपण सहभागी व्हावे, असे आवाहन रेखाने केले आहे़
सामाजिक दायित्व म्हणून स्विकारली जबाबदारी
शंभर रूपयांमध्ये एखाद्या व्यक्तीचे स्केच तयार करून परवडणारे नाही़ परंतु, सदर काम मी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून स्विकारले आहे़ पुण्यात राहून सध्या लॉकडाऊनच्या सुट्या या सत्कारणी लावण्याचा हा चांगला मार्ग वाटला म्हणून सदर उपक्रमाची माहिती फेसबुकर टाकली त्यास खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे़ टॅबपेनच्या माध्यमातून फोटो स्केटच बनविले जात आहे़ शंभर रूपयांपासून ते हजार रूपयांपर्यंत मित्र-मैत्रिणी यामध्ये पैसे टाकत आहेत़ ही सर्व रक्कम धान्य खरेदीसाठी वापरली जाईल़ त्यातून गरजूंची चूल काही दिवस पेटेल, असा विश्वास आहे़
- रेखा गायकवाड, अर्टिस्ट