CoronaVirus : एक विवाह असाही ! आई - वडिलांच्या साक्षीने सहजीवनाची घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 07:33 PM2020-03-31T19:33:54+5:302020-03-31T19:37:10+5:30
लघूळ येथे कृतीतून कोरोना रोखण्याचा संदेश
सगरोळी (जि़.नांदेड ) सध्या कोरोनाची धास्ती संपूर्ण जगानेच घेतली आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुुरु आहेत़ सर्व व्यवहार तसेच सार्वजनिक कार्यक्रमही ठप्प झालेले आहेत़ यातून विवाह सोहळे सुध्दा सुटलेले नाहीत़ मात्र बिलोली तालुक्यातील सगरोळी सर्कलमधिल मौजे लघूळ येथे एक विवाह सोहळा संपन्न झाला़ विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करीत आपल्या राहत्या घरीच केवळ आई वडिल आणि जवळच्या चार नातेवाईकांच्या साक्षीनेच हा विवाह पार पडला.
बिलोली तालुक्यातील सगरोळी सर्कलमधिल मौजे लघूळ येथिल पद्मीनबाई विजय कुडकेकर यांची कन्या पुजा ही सध्या परिचारिका म्हणून काम करीत आहे. गावातीलच रहिवाशी असलेले लक्ष्मीबाई यादव मिरजे यांचे चिरंजीव सुरेश हे सध्या पुणे येथे एका अशासकिय कंपनीत कामाला आहेत़ त्यांचा विवाह २९ मार्च रोजी ठरला होता. सत्यशोधक पध्दतीच्या रिवाजाप्रमाणे दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारीही सुरू केली होती. संपूर्ण नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या़ दरम्यान, कोरोनाचे संकट वाढले, हा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी शासकिय पातळीवर उपाययोजना सुरु झाल्या़ त्यातूनच संचारबंदी लागू झाली़ त्यामुळे आपोआपच विवाह सोहळेही थांबले़ मात्र कुडकेकर आणि मिरजे कुटूंबियांनी शासनाच्या नियम व जमावबंदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला़ आणि त्यानूसार आई-वडीलांसह जवळच्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा उरकला़
फुले दामत्यांच्या प्रतिमेस वंदन करुन जोडले नाते
१८९७ च्या प्लेग या जीवघेण्या साथीच्या आजारात रूग्ण सेवा करतांना प्राण गमावलेल्या शिक्षणज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासह सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून महापुरुषांच्या प्रतिमेच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. या माध्यमातून वेळ व पैशाचा अपव्ययही टाळण्याचा संदेशही या कुटुंबाने प्रत्यक्ष कृतीद्वारे दिला आहे़