coronavirus : पंजाबमुळेच वाढला प्रादुर्भाव; नांदेडवरील आरोप निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:13 PM2020-05-06T14:13:59+5:302020-05-06T14:19:09+5:30
शहराच्या इतर भागातील अवघे दोन रुग्ण असल्याने पंजाबचा नांदेडवरील आरोप आता निराधार ठरत आहे़
- विशाल सोनटक्के
नांदेड : पंजाबमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे़ सोमवारपर्यंत तेथे बाधित रुग्णांची संख्या १२३२ वर जाऊन पोहोचली आहे़ नांदेडमुळे पंजाबात कोरोना वाढल्याचा आरोप केला जात असताना येथे मात्र सोमवारपर्यंत ३४ जण बाधित आढळलेले आहेत़ त्यातही तब्बल ३१ रुग्ण हे लंगर साहिब गुरुद्वारा परिसरातील असून, शहराच्या इतर भागातील अवघे दोन रुग्ण असल्याने पंजाबचा नांदेडवरील आरोप आता निराधार ठरत आहे़
नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे येथेच अडकून पडलेल्या सुमारे ४ हजार भाविकांना केंद्र शासनाच्या परवानगीनंतर तीन टप्प्यात पंजाबला पाठविण्यात आले़ यातील काही भाविकांमुळेच पंजाबमधील कोरोनाचा आकडा वाढल्याचा ठपका ठेवला जात आहे़ मात्र सुमारे दीड महिना हे भाविक नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वारामध्ये थांबलेले होते़ त्यांची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्थाही केली होती. भाविकांना पंजाबला पाठविण्यापूर्वी एकही रुग्ण बाधित का निघाला नाही?, असा प्रश्न आता नांदेडकरांकडून उपस्थित केला जात आहे़ नांदेडमध्ये मंगळवारपर्यंत १ हजार २३८ व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले असून, त्यातील तब्बल १२३८ अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
कोरोना संसर्गावरून कोणतेही राजकारण करण्याची ही वेळ नाही़ तर या संकटावर एकत्रित येऊन मात करण्याची गरज आहे़ नांदेडहून परतलेल्या भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप केला जात आहे़ मात्र, त्यात तथ्य दिसत नाहीत़
- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड