CoronaVirus : धर्माबादच्या मिरचीला लॉकडाऊनचा ठसका; हजारो जणांचा रोजगार बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 08:49 PM2020-04-24T20:49:09+5:302020-04-24T20:56:38+5:30

कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे महिन्याकाठी सुमारे दहा कोटीची उलाढालही ठप्प झाली असून दोन हजार मजूरांसह इतर शेकडो जणांचा रोजगारही बुडाला आहे.

CoronaVirus: Lockdown on Dharmabad pepper; Thousands lost their jobs | CoronaVirus : धर्माबादच्या मिरचीला लॉकडाऊनचा ठसका; हजारो जणांचा रोजगार बुडाला

CoronaVirus : धर्माबादच्या मिरचीला लॉकडाऊनचा ठसका; हजारो जणांचा रोजगार बुडाला

googlenewsNext
ठळक मुद्देमिरचीचा मोठा साठा लॉकडाऊनमुळे पडूनलॉकडाऊनने अनेकांचा रोजगार हिरावला

- लक्ष्मण तुरेराव

धर्माबाद: (जि. नांदेड ) धर्माबाद येथील लाल तिखट मिरचीची महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र मराठवाड्यातील प्रसिध्द असलेल्या या मिरचीचा बाजार यंदा लॉकडाऊनमुळे ठप्प झाला असून,  दरवर्षी एप्रिल-मे मध्ये व्यापारी आणि ग्राहकांची गजबजाट असलेली ही औद्योगिक वसाहत यंदा ओस पडल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे महिन्याकाठी सुमारे दहा कोटीची उलाढालही ठप्प झाली असून दोन हजार मजूरांसह इतर शेकडो जणांचा रोजगारही बुडाला आहे.

महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सिमेवर धर्माबाद तालुका असल्याने येथील नागरिकांचे महाराष्टÑाबरोबरच तेलंगणासोबतही रोटी- बेटीचे नाते जोडलेले आहे. येथील मिरचीची बाजारपेठ प्रसिध्द असून, कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यवहार चालतो.  सुरुवातीला ठराविक व्यापारीच या व्यवसायात होते. मात्र येथील मिरचीची ख्याती परिसरात पसरु लागली तसतसे विविध ठिकाणचे व्यापारी धर्माबादला येवू लागले. यातून मिरचीची आवक वाढत गेली. दरवर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत येथील बाजारपेठ गजबजलेली असते. मिरची व्यापारासाठी येथे खास  औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत वाळलेल्या लाल मिरचीची पावडर करुन देणारे बारा कांडप  कारखाने असून एका मिरची कांडपावर एका तासात दोन क्विटंल मिरची पावडर केली जाते. दररोज साधारण २० ते २५ लाखाची उलाढाल येथे होत असते. महाराष्टÑातील विविध जिल्ह्यासह तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील निझामाबाद, हैद्राबाद, कामारेडी, म्हैसा, बोधन, साठापूर, नंदीपेट, बासरी, मुधोळ आदी ठिकाणांहून मिरची खरेदीसाठी येथे व्यापाऱ्यासह नागरिक येतात. प्रत्येक व्यक्ती येथे येवून वर्षभरासाठी साधारण दहा ते वीस किलो मिरची खरेदी करुन तेथेच त्याची मिरची पावडर करून घेतो. मात्र लॉकडाऊनमुळे यंदा ना बाहेरचे व्यापारी आले, ना ग्राहक त्यामुळे धर्माबादमधील हा प्रसिध्द उद्योग संकटात सापडला आहे. ऐन सिजनमध्ये कोरोनाचे संकट आल्याने औद्योगिक वसाहतीला कोट्यावधींचा फटका बसला आहे.  बाहेर राज्यातून आलेली कोट्यवधीची मिरचीही पडून आहे.  कोल्डस्टोअर मध्ये जागा नसल्याने ती मिरची काळी पडून खराब होत असल्याचे औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अमीरोद्दीन शेठ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

मिरचीचा मोठा साठा लॉकडाऊनमुळे पडून
 खरेदी केलल्या मिरचीचे ग्राहकांच्यासमोरच पसंतीनुसार लहान-मोठे कांडप करुन दिले जाते. ही धर्माबाद येथील या बाजाराची खासियत आहे. या पध्दतीमुळे भेसळ कसलीही होत नाही. शिवाय मिरचीचे अनेक नमुणे येथे उपलब्ध असतात त्यामुळेही वर्षाच्या खरेदीसाठी ग्राहक धर्माबादला येतो. साधारणपणे तेलंगणा, आंध्रप्रदेशतील हैद्राबाद, वरंगंल, खमम, गुंटुर, गुलबगा आदी भागातुन टु सेव्हन थ्री,एसटेन, सीएस, डीडी, सुवर्णा, तेजा गावराणी, बॅडगी आदी मिरचीचे विविध नमुने येथे उपलब्ध असतात. गावराण,बॅडगी हि मिरची विस ते पंचवीस हजार रुपये प्रती क्विंटल आयात  होते. तर गुंटुर, तेजा, २ सेव्हन ३ आदी मिरची पंधरा ते वीस हजार प्रती क्विंटल भावाने आयात केली जाते. मात्र यंदा आयात केलेला मोठा साठा व्यापाऱ्यांकडे पडून आहे.

लॉकडाऊनने अनेकांचा रोजगार हिरावला
मिरचीचा बाजार जानेवारी ते जून पर्यंत तेजीत असतो.  या वसाहतीत ग्रहकांनी मिरची खरेदी केल्यानंतर ती देठ काढण्यासाठी दिली जाते. धर्माबादसह परिसरातील रत्नाळी, बाळापूर येथील साधारण दोन हजार महिला, पुरुष देठ काढण्याचे काम करतात. मात्र या सर्वाना आता रोजगारापासून मुकावे लागले आहे.  मिरचीचे देठ काढण्यासाठी प्रती किलो मागे दहा ते पंधरा रुपये मिळत होते.  यातून एका महिलेची दररोज  चारशे ते पाचशे रुपये कमाई  होत असे मात्र यंदा व्यवसायच ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्या या मजुरांची कोंडी झाली आहे.  

पाच हजार जणांची रोजीरोटी अवलंबून
आपल्याला हवी त्या जातीची मिरची खरेदी करायची आणि येथेच  कांडप करुन मिरची पावडर घेवून जायची असे अनेकजण करतात़ यासाठी महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा, आंध्रामधून दरवर्षी हजारो ग्राहक धर्माबादला येत असतात़ या व्यवसायावर व्यापारी, मजूर, मिरची उत्पादक शेतकरी अशा सुमारे ५ हजार जणांची रोजी रोटी अवलंबून आहे़  मात्र यंदा लॉकडाऊनमुळे व्यापार ठप्प पडल्याने हा बाजार अडचणीत सापडला आहे़  अशा वेळी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़.
- अमीरोद्दीन शेठ, चेअरमन, औद्योगिक वसाहत, धर्माबाद

Web Title: CoronaVirus: Lockdown on Dharmabad pepper; Thousands lost their jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.