coronavirus : मिशन ब्रेक द चेन : सुधारा, अन्यथा कडक लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 08:28 PM2020-07-08T20:28:40+5:302020-07-08T20:30:39+5:30

रुग्णसंख्येत मात्र वाढ होत आहे़ याच कारणामुळे शेजारील हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन

coronavirus: mission break the chain: improve, otherwise severe lockdown; Collector's warning | coronavirus : मिशन ब्रेक द चेन : सुधारा, अन्यथा कडक लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

coronavirus : मिशन ब्रेक द चेन : सुधारा, अन्यथा कडक लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

Next
ठळक मुद्देनागरिक, व्यापारी यांनी कोरोनाबाबतची बेफिकिरी सोडण्याचे आवाहन  पाहणी करुन पुढील निर्णय घेण्यात येईल़

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे़ परंतु नागरिकांची बेफिकीरी मात्र सुरुच आहे़ याबाबत जिल्हाधिकारी डॉ़विपीन ईटणकर यांनी मंगळवारी व्यापाऱ्यांची बैठक घेतली़ या बैठकीत त्यांनी  कोरोनाच्या नियमाबाबत नागरिक आणि व्यापाऱ्यांची पुढचे काही दिवस अशीच बेफिकीरी दिसल्यास लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे़ यावेळी व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे तूर्त लॉकडाऊनचा निर्णय टळला आहे़

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ४५८ रुग्ण झाले आहेत़ तर मृत्यू पावलेल्यांची संख्या २२ वर पोहोचली आहे़ दिवसेंदिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ त्याचबरोबर नवीन भागात रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे़ दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर २२ मे पासून जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत़ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच मात्र नागरिक सुसाट सुटले आहेत़ सुरुवातीचे काही दिवस कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यात आले़ परंतु आता विक्रेते आणि ग्राहक या दोघांनाही कोरोनाच्या धोक्याचा विसर पडल्याचे त्यांच्या बेफिकीरीवरुन दिसून येते़ त्यामुळे रुग्णसंख्येत मात्र वाढ होत आहे़

याच कारणामुळे शेजारील हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन केला़ त्यामुळे नांदेडातही लॉकडाऊन होणार याबाबत गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरु आहे़ पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखविला होता़ त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली़ या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या़ तसेच आगामी काही दिवस कोरोनाचे नियम पाळण्यात येत आहेत किंवा नाही? याची पाहणी करुन पुढील निर्णय घेण्यात येईल़ अशाचप्रकारे सर्वांची बेफिकीरी सुरु राहिल्यास लॉकडाऊन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे़ 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मिशन ब्रेक द चेन राबविण्यात येत आहे़ विक्रेते आणि ग्राहक या दोघांकडूनही नियमांचे पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत यापुढे दोघांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले़ पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांना त्यांनी कोरोनाबाबत तयार केलेल्या नियमावलीचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ सर्व यंत्रणांना त्याबाबत स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले़ त्यामुळे कोरोनाबाबतची बेफिकीरी पुन्हा लॉकडाऊनकडे घेवून जाणार आहे़ 

पुन्हा दंडात्मक कारवाई 
बाजारपेठेत फिरताना अनेकजण तोंडाला मास्क लावत नसल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे आता मास्क न वापरणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे एक हजार रुपयांना पडणार आहे़ दुचाकीवर एकापेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास ५०० रुपये, तीन चाकीमध्ये तिघांपेक्षा अधिक जण असल्यास एक हजार रुपये दंड लागणार आहे़ चारचाकीत तिघांपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास एक हजार, दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहक, दुकानातील कर्मचाऱ्यांना मास्क, सामाजिक अंतराचे पालन न झाल्यास पाच हजार रुपये दंड लावण्यात येणार आहे़ दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत़ मनपा, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतस्तरावर त्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत़ 

शहरात सुरुवातीच्या काळात दुकानासमोर सर्कल तयार करण्यात आले होते़ परंतु आता या सर्कलचाही विसर अनेकांना पडला आहे़ त्यामुळे दुकानात एकाचवेळी गर्दी होत आहे़ शहरात दुचाकीवरुन डबल आणि ट्रीपल सीट बिनधास्तपणे नागरिक फिरत आहेत़ आता अशा वाहनधारकांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे़ बाजारपेठेत फिरत असतानाही अनेकजण मास्क लावण्याचेही टाळत आहेत़ तर काही जण ते चुकीच्या पद्धतीने लावत आहेत़ आता त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे़ 

Web Title: coronavirus: mission break the chain: improve, otherwise severe lockdown; Collector's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.