Coronavirus In Nanded : जिल्ह्यात '3- टी' सूत्राचा होणार वापर; मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:23 PM2020-07-25T21:23:23+5:302020-07-25T21:24:20+5:30
यंत्रणेवर ताण वाढला : ३- टी त्रिसूत्रीचा करणार वापर
नांदेड : रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे़ अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास अडचण येत आहे़ त्यामुळे ५० वर्षांवरील नागरिक, विदेश किंवा जिल्ह्याबाहेरुन आलेले व ज्यांना प्राथमिक लक्षणे आहेत़ अशा नागरिकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे़ तालुकास्तरावर त्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे़
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या पुढे गेली आहे़ बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी आरोग्य विभागाचे डॉक्टर, आशा वर्कर व एएनएम हे करीत आहेत़ परंतु दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे़ त्यामुळे कोविड रुग्णांच्या संपर्काततील तसेच ५० वर्षांपेक्षा ज्यांचे वय जास्त आहे़ तसेच विदेशातून, इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून प्रवास केला अशा नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे़
यामध्ये ट्रेस, टेस्ट अॅन्ड ट्रीट अशा ३ टी त्रिसूत्रीचा वापर करुन प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न असणार आहे़ मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिट अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे़ ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे़ तसेच ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले़ परंतु प्राथमिकदृष्ट्या कोविड लक्षणे दिसून येत आहेत, अशा नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे़
सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, विविध संघटना, सामाजिक संस्था यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिकारी यांना सर्वेक्षण करताना सहकार्य करावे़ तसेच जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्यासाठी व जिल्हा करोनामुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा़ आपल्या परिसरात कोविडची लक्षणे असलेल्यांची माहिती मिळाल्यास ती लगेच प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे़