CoronaVirus : मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यूदर नांदेडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:52 PM2020-07-18T19:52:10+5:302020-07-18T19:53:04+5:30
नांदेडचा मृत्यूदर ५.३८, मुंबईतील मृत्यू दराशी बरोबरी
- शिवराज बिचेवार
नांदेड : मराठवाड्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मराठवाड्यात सर्वाधिक ५.३८ इतका मृत्यूदर नांदेड जिल्ह्याचा असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे हैराण झालेल्या मुंबईचा मृत्यूदर ५़६८ असून, नांदेड त्याच्या जवळ पोहोचल्याने चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने शेवटचा उपाय म्हणून आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला़; परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या पंधरा दिवसांत रुग्ण दुप्पट तर मृत्यू अडीचपटीने वाढले आहेत़ जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती़ १७ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे़ जूनच्या अखेरीस जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू झाला होता़ आता जुलैच्या मध्यापर्यंत हा आकडा ४३ वर पोहचला आहे़ कोरोना अत्यवस्थ रुग्णांना विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात येते़ या ठिकाणी या रुग्णांवर उपचार होतो़ मृत्यू झालेल्या प्रत्येक रुग्णाला उच्च रक्तदाब, मधूमेह, श्वसनाचा त्रास यासारखे गंभीर आजार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे़ मृत्यू पावणाऱ्यांमध्ये वयोवृद्धासह तरुण आणि अकरा महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश आहे़ शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्ण नांदेडातच उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
मृत्यू कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न
कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत़ रुग्णालयामध्ये सध्या सर्व प्रकारच्या औषधीसह इतर आवश्यक साधनांची मुबलक उपलब्धता आहे़ नांदेड येथील रुग्णालयात हिंगोली, परभणी, लातूर यासह इतर भागांतूनही अत्यवस्थ कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत़ या रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे़
-डॉ़ नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड