coronavirus : कोरोनाशी चार हात करण्यास नांदेड थांबलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 05:21 PM2020-03-22T17:21:07+5:302020-03-22T17:21:23+5:30
नांदेड शहर व परिसरात उस्फुर्त प्रतिसाद
- श्रीनिवास भोसले
नांदेड : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार नांदेड मधील जनतेने रविवारी जनता कर्फ्यूमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवत घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे गर्दीने खचाखच असणाऱ्या मुख्य चौक आणि रस्त्यावर आज भयाण शांतता पाहयला मिळाली.
नांदेड शहरात कोरोणाचे संशयित रुग्ण आढळून आले. परंतु त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोरोना व्हायरस च्या प्रसारामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. सदर कोव्हीड 19 व्हायरस रोखण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. शासनाने सूचित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. नांदेड शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने दुकाने शनिवारी पहाटेपासूनच बंद होती. दरम्यान रविवारी 100% नांदेड बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील जुना मोंढा, भावसार चौक, बसस्थानक- रेल्वेस्थानक, वजीराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर आदी ठिकाणांवर आज शुकशुकाट पाहायला मिळाला। नांदेड शहरातील व्यापाऱ्यांनी रविवारसह सोमवार आणि मंगळवारी देखील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सलग चार दिवस पहिल्यांदा नांदेड शहर व परिसरात अघोषित संचारबंदी सदृश्य चित्र पाहायला मिळेल. आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी असोसिएशन च्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान रविवारी शहरात विनाकारण रस्त्याने फिरणार्या तरुणांना समज देण्याचे कामही पोलिसांनी केले. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रवासी अडकले स्थानकात
परजिल्ह्यातून नांदेडात पहाटे दाखल झालेल्या प्रवाशांना गावी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होऊ शकले नाही, त्यामुळे अनेकांना बसस्थानक रेल्वेस्थानक अडकून पडावे लागले आहे.