CoronaVirus : लॉकडाऊन काळात नांदेड पोलिसांनी वाहनधारकांकडून ७० लाखांचा दंड केला वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:53 PM2020-04-04T17:53:16+5:302020-04-04T17:56:44+5:30
शहरातील विविध भागात दीडशे दुचाकी गाड्या केल्या जप्त
नांदेड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे़ परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत अनेकजण फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत आहेत़ अशा दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून काही दिवस दंडात्मक कारवाई करण्यात आली़ परंतु शुक्रवारपासून पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली असून थेट दुचाकीच जप्त करण्यात येत आहे़ पहिल्याच दिवशी दीडशे दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे़ अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ भाजीपाला, किराणा साहित्य, औषधी घरपोच मिळण्यासाठी नागरीकांना हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आल्या आहेत़ परंतु, त्यानंतरही नागरिक घराबाहेर पडत आहेत़ त्यामुळे यंत्रणेवरील ताण वाढत आहे़ पोलिसांकडून सुरुवातीला अशा नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ दररोज साधारणत: दीड ते दोन हजार जणांकडून दंड वसूल करण्यात आला़ परंतु, दंडात्मक कारवाईलाही नागरिक जुमानेसे झाले़ त्यामुळे पोलिसांनी आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़ शुक्रवारपासून शहरात दुचाकी जप्तीला सुरुवात करण्यात आली आहे़
पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांतून जवळपास दीडशे दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ तर आतापर्यंत ७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांनी दिली़ दरम्यान, शुक्रवारी विनाकारण घराबाहेर पडलेल्या अनेकांना पोलिसांनी रस्त्यावर बसविले़ तसेच त्यांच्या दुचाकी जप्त केल्या़ पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे शुक्रवारी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडलेल्यांची संख्या बरीच कमी झाली होती़ त्यामुळे रस्त्यावरही शुकशुकाट होता़
१५ एप्रिललाच मिळणार दुचाकी
च्नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे़ परंतु याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असून रस्त्यावर गर्दी करीत आहेत़ प्रत्येक वाहनधारकांची कसून तपासणी करण्यात येत आहे़ परंतु यावेळी काही जण वादही घालत आहेत़ त्यामुळे आता दुचाकी जप्तीस सुरुवात करण्यात आली आहे़ जप्त केलेल्या या दुचाकी आता वाहनधारकाला १५ एप्रिलला मिळणार आहेत, अशी माहिती पोनि़चंद्रशेखर कदम यांनी दिली़