CoronaVirus : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीयांची वाट खडतरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:39 PM2020-05-04T17:39:55+5:302020-05-04T17:42:11+5:30
रांगा लावून ही तपासणी करुन घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीचे आव्हानही या नागरिकांसमोर उभे आहे़
नांदेड : इतर राज्यातील तसेच इतर जिल्हयातील नागरीक, विद्यार्थी नांदेड जिल्हयात मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत़ या नागरिकांना त्यांच्या मुळगावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी यासाठीची प्रक्रिया किचकट असल्याने या नागरिकांची वाट खडतरच आहे़ सोमवारी आरोग्य तपासणीसाठी या नागरिकांनी श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती़
कोरोना रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकजण बाहेरील जिल्ह्यातील तसेच बाहेरील राज्यातील नांदेडमध्ये अडकलेले आहेत़ अशा नागरिकांना आप-आपल्या गावी जाण्यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी ँhttps://covid19.mhpolice.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे़ या संकेतस्थळावर परीपुर्ण माहितीसह छायाचित्र व इतर आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करून माहिती नोंदणी केल्यानंतर संबंधीत अर्जदारास आॅनलाइन टोकण क्रमांक प्राप्त होणार आहे़ हा आॅनलाईन टोकन क्रमांक त्याच संकेतस्थळावरून डाऊनलोड पास या आॅपशनवर आपला टोकण क्रमांक नोंदवून पासची प्रिंट काढुन घ्यायची आहे़
या पास नोंदणीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळेच सोमवारी शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या़ ही रांग या रुग्णालयापासून वजीराबाद चौरस्तापर्यंत गेली होती़ परंतू सकाळी १० वाजेपर्यंतच तपासणी केल्यानंतर राहिलेल्या विद्यार्थी तसेच परप्रांतीयांना उद्या या म्हणून परत पाठविण्यात आले़ यामुळे अनेकांची निराशा झाली़ रांगा लावून ही तपासणी करुन घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीचे आव्हानही या नागरिकांसमोर उभे आहे़