पंजाबचा ठपका बिनबुडाचा; नांदेडहून गेलेले भाविक पाच राज्यातील प्रवासादरम्यान थांबले होते हॉटस्पॉट क्षेत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:22 PM2020-05-01T17:22:49+5:302020-05-01T17:29:17+5:30
नांदेडहून पंजाबला गेलेल्या या भाविकांनी पाच राज्यातून प्रवास केला असून, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या इंदौर येथेही बराच काळ व्यथीत केल्याचे आता पुढे येत आहे.
- विशाल सोनटक्के
नांदेड: नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे येथेच अडकून पडलेल्या सुमारे चार हजार भाविकांना केंद्र शासनाच्या पंजाबला पाठविण्यात आले. यातील काही भाविकामुळेच पंजाबमधील कोरोनाबाधितांचा आंकड़ा वाढत असल्याचा ठपका ठेवला जात आहे. मात्र हा दावा बिनबुडाचा तसेच नांदेडची बदनामी करणारा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नांदेडहून पंजाबला गेलेल्या या भाविकांनी पाच राज्यातून प्रवास केला असून, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या इंदौर येथेही बराच काळ व्यथीत केल्याचे आता पुढे येत आहे.
श्री हुजूर साहिब सचखंड गुरु०दाराच्या दर्शनासाठी पंजाब, हरयाणा, राजस्थानसह दिल्ली येथील भाविक नांदेडला आले होते. कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी अचानक लॉकडाऊन केल्याने सुमारे चार हजाराहून अधिक भाविक दिड महिना नांदेडमध्येच अडकून पडले. येथील मुख्य गुरूद्वारा व लंगर साहिब गुरूव्दाराच्या वतीने यात्री निवासमध्ये या सर्व भाविकांची राहण्याची व भोजनाची अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अडकलेल्या या भाविकांना पंजाबमध्ये विशेष वाहनाने पाठविण्याची आग्रही मागणी होवू लागली. या अनुषंगाने पंजाब आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या सर्व भाविकांना विशेष वाहनाने पंजाबकडे पाठविव्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात लंगर साहिब गुरूव्दाराच्या वतीने १४ बस व १२ ट्रॅव्हल्सद्वारे ५७० यात्रेकरूंना रवाना करण्यात आले. त्यानंतर सचखंड गुरूव्दाराच्या वतीने तेथे थांबलेल्या ३३० यात्रेकरूना द्रुसऱ्या टप्प्यात १० बसव्दारे रवाना करण्यात आले. उर्वरीत सुमारे तीन हजार भाविकांना घेवून जाण्यासाठी पंजाब सरकारने ८० लक्झरी बसेस नांदेडला पाठविल्या होत्या. या गाडयातून २७ एप्रील रोजी सर्व भाविकांना पाठविण्यात आले. याच भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचा दावा आता केला जात आहे. मात्र नांदेडकरांनी पंजाबचा हा ठपका फेटाळला आहे.
या सर्व भाविकांची पंजाबला रवानगी होण्यापूर्वी त्यांची नांदेड येथे आरोग्य तपासणी करण्यात आली होती. याबरोबरच नांदेड महानगरपालिकेच्या पथकाने या सर्व भाविकांना पाठविण्यात येणाऱ्या गाडयाही सॅनिटाईज केल्या होत्या. नांदेडमध्ये दिड महिना थांबले असताना एकही भाविक पॉजिटिव्ह निघालेला नसताना पंजाबमध्ये जातात हे भाविक पॉजिटिव्ह झाले कसे? मग नांदेडमध्ये त्याचवेळी बाधितांची संख्या का वाढली नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हॉटस्पॉट इंदोरमध्ये थांबले होते भाविक
नांदेडहून पंजाबला निघालेल्या या भाविकांनी प्रवासादरम्यान चार ठिकाणी थांबा घेतला. यामध्ये इंदोर ( मध्यप्रदेश) भिलवाडा आणि हनुमानगड (राजस्थान) आणि त्यानंतर भटिंडा (पंजाब) येथे थांबून हे भाविक पंजाबमधील आपापल्या गावी रवाना झाले होते. विशेष म्हणजे प्रवासात सर्वाधिक जास्त वेळ ते मध्यप्रदेशात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या इंदोर येथे थांबले होते. तेथेच या भाविकांना कोरोनाची बाधा झाली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पंजाबचे सचिव दर्जाचे अधिकारी होते सोबत
नांदेडहून पंजाबला घेवून निघालेल्या वाहनांच्या ताफ्या सोबत पंजाब राज्य शासनाचे सचिव दर्जाचे अधिकारीही सोबत होते. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करुनच भाविकांच्या ताफ्याला नांदेडकरांनी पाठविले होते. हेही स्पष्ट होते.
नांदेडमध्ये लागण झाली म्हणणे चुकीचेच
लॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये अडकलेल्या पंजाबमधील भाविकांची श्री. लंगर साहिब येथे सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे दिड महिना हे भाविक नांदेडमध्ये होते. या कालावधित त्यांची नियमित आरोग्य तपासणीही करण्यात येत होती. शिवाय पंजाबला पाठवितानाही आरोग्य पथकाने तपासणी केली होती. त्यामुळे या भाविकांना नांदेडमध्ये कोरोनाची बाधा झाल्याचा आरोप चुकीचा तसेच बिनबुडाचा असल्याची प्रतिक्रिया श्री. लंगर साहिब गुरूव्दाराचे संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी व्यक्त केली आहे.