coronavirus : उमरीकरांना दिलासा; हैदराबाद येथून परतलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 02:49 PM2020-03-23T14:49:51+5:302020-03-23T14:52:08+5:30
काळजी घेण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन
उमरी ( जि. नांदेड ) : हैदराबाद येथून आलेल्या वीस वर्षीय तरूणाचा कोरोनाविषयीचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी उमरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर चव्हाण यांच्याशी फोनवरून ही माहिती दिली. पुणे येथून या संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले . असे असले तरीही या तरुणास आणखी काही दिवस उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डांमध्ये निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे . त्यानंतर दोन आठवडे त्याला होम कोरोन्टाईल केले जाईल . कारण सात ते पंधरा दिवसानंतर या साथीच्या रुग्णाचा आजार जाणवू शकतो . त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना सारख्या महाभयंकर साथीने तब्बल दोन आठवड्यानंतर अनेक देशांमध्ये थैमान घातल्याचे दिसून आले. त्यामुळे आपल्याला पुढील काही दिवस त्याबाबत अत्यंत सतर्क राहून काम करावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य खात्याला सहकार्य करावे. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहू नये,त्यांच्यासाठी राहण्याची वेगळी व्यवस्था करावी. कुणीही घराच्या बाहेर पडू नये . नेहमी हात स्वच्छ धुवावेत. बाहेरच्या लोकांशी संपर्कात येऊ नये. पुढचे दोन आठवडे सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यासाठी सर्वांनी गांभीर्याने घ्यावे. असे आवाहन डॉक्टरांनी केले.