coronavirus : मुखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांसह पाचजण बाधित आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 08:53 AM2020-06-15T08:53:23+5:302020-06-15T08:53:52+5:30
नव्या पाच रुग्णांमुळे मुखेडमधील एकूण रुग्णांची संख्या १५ झाली आहे.
नांदेड : रविवारी प्राप्त झालेल्या ९८ स्वॅब तपासणी अहवालात एकही पॉजिटिव्ह रुग्ण आढळलेला नव्हता त्यामुळे दिलासा मिळालेला असतानाच रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पाचजण बाधित आढळले आहेत. हे सर्व पाचही रुग्ण मुखेड येथील असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
नव्याने आढळून आलेल्या या पाच जणात दोघे ५२ वर्षाचे, एकजण ६२ वर्षाचा आणि अन्य दोघे ५५ व ४७ वर्षीय आहेत. विशेष म्हणजे त्यातील तिघे एकाच कुटूंबातील आहेत. रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोमवारी सकाळीच प्रशासनाने बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.
या नव्या पाच रुग्णांमुळे मुखेडमधील एकूण रुग्णांची संख्या १५ झाली आहे. तर आठ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या पूर्वीच्या दोघांसह नव्याने आढळलेले ५ अशा सात रुग्णावर उपचार सुरू आहेत. मुखेड येथे आढळलेल्या या पाच नव्या रूग्णांमुळे जिल्हयातील बाधितांची एकूण संख्या २६१ एवढी झाली आहे.