CoronaVirus : नांदेडमध्ये दुसऱ्या कंटेंटमेन्ट झोनमध्ये सर्वे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 01:25 PM2020-04-27T13:25:16+5:302020-04-27T13:26:12+5:30
महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने व इतर अधिकाऱ्यांनी रविवारी रात्रीच कोरोना रुग्ण राहत असलेल्या अबचलनगरमध्ये भेट दिली.
नांदेड- नांदेडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णाचा शोध लागल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच महापालिका आरोग्य पथकांनी अबचलनगर या परिसरातील इतर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली आहे. त्याचवेळी सदर रुग्णाच्या कुटूंबियांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने व इतर अधिकाऱ्यांनी रविवारी रात्रीच कोरोना रुग्ण राहत असलेल्या अबचलनगरमध्ये भेट दिली. सदर भाग सील करण्याची प्रक्रिया रात्रीच सुरू झाली. सोमवारी सकाळी या भागातून कोणालाही बाहेर जाऊ दिले नाही तसेच आतही कोणाला सोडले नाही. सदर कोरोनाचा रुग्ण हा खाजगी वाहनाचा चालक होता. आपल्या वाहनातून त्याने पंजाबला काही भाविकांना नेऊन सोडले. पंजाबहून परत आल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. त्याला विलगीकरण कक्षात ठेवून त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला होता. तो रविवारी रात्री पॉजिटीव्ह आला.
शहरात पीरबुऱ्हाण नगरात 22 एप्रिल रोजी एका 64 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो नांदेड जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण ठरला होता. पाच दिवसानंतर आता अबचलनगरमध्ये दुसरा रुग्ण आढळून आला आहे. पीरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचेच म्हणजे जवळपास 80 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नांदेडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण दुसरा रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा नांदेडकर चिंतेत पडले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. महापालिका आयुक्त डॉ. लहाने यांनी शहरवासियांनी कोरोनाच्या अनुषंगाने महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.