coronavirus : उमरीत आलेला हैदराबाद येथील हॉटेल कर्मचारी कोरोना संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 03:32 PM2020-03-21T15:32:46+5:302020-03-21T15:35:01+5:30
उपचार सुरु असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उमरी : कोरोना संशयित रुग्ण उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला असून त्याच्यावर आयसोलेशन वॉर्डामध्ये उपचार चालू आहेत. हैदराबाद येथील एका नामांकित हॉटेलमध्ये परदेशी पर्यटकांशी त्याचा संपर्क आला होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तालुक्यातील एक २० वर्षे तरुण हैदराबाद येथे एका नामांकित हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून काम करतो. शुक्रवारी सायंकाळी देवगिरी एक्स्प्रेसने तो उमरीत आला. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने तो स्वत:च थेट उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव विभुते यांनी त्याच्यावर उपचार केले . आज सकाळी अधिक्षक डॉ. शंकर चव्हाण व डॉ. आशिष कदम यांनी त्याचेवर उपचार केले .
सध्या या तरुणाची प्रकृती चांगली असून त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. कोरोनासंबंधित लक्षणे व त्याचा हैदराबाद येथील हॉटेलमध्ये परदेशी पर्यटकांशी आलेला संपर्क यामुळे डॉक्टरांनी त्यास निगराणीखाली ठेवले आहे.
आज शनिवारी या रुग्णाचे रक्त व लाळेचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत . त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील उपचारासाठी निर्णय घेण्यात येईल . अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ . शंकर चव्हाण यांनी दिली. उमरी शहरातील नागरिकांनी कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये . वैयक्तिक स्वच्छता बाळगावी व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये शक्यतो प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातच राहावे . कुणालाही काही आजार जाणवल्यास लगेच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी दवाखान्यात दाखल होऊन उपचार करून घ्यावा. असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.