coronavirus : मुक्त विद्यापीठाचे ठरले; अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना देणार पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 04:58 PM2020-07-13T16:58:13+5:302020-07-13T17:05:01+5:30
विद्यापीठाने अंतिम वर्षात शिकणाऱ्या सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे, असा पर्याय दिला आहे़
- भारत दाढेल
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता अंतर्गत गुणावर निकाल घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे नांदेड विभागातील लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २२ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत़
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातंर्गत अंतिम वर्षात प्रवेशित असलेल्या अव्यावसायिक शिक्षणक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने निर्णय घेवून परीक्षा न घेता पदवी प्रमाणपत्र देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे़ या निर्णयामुळे नांदेड विभागातील पदवीच्या अंतिम वर्षातील २० हजार तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अडीच हजार विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत़
मुक्त विद्यापीठात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न पडला होता़ मे मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भात कोणताच निर्णय होत नसल्याने या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली होती़ अखेर मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे, असा पर्याय दिला आहे़
अशा विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा विद्यापीठ मूल्यमापन अंतिम परीक्षेच्या विषयनिहाय गुणांना प्रत्येकी प्रथम वर्ष ८० पैकी ५० टक्के व द्वितीय वर्ष ८० पैकी ५० टक्के असे एकूण ४० अधिक ४० बरोबर ८० पैकी विद्यापीठ मूल्यमापनाचे तृतीय, अंतिम वर्ष, सत्राचे गुण दर्शविण्यात येतील़ तर अंतर्गत मूल्यमापन २० पैकी गुण हे अभ्यासकेंद्राकडून आॅनलाईन पद्धतीने मागवून ते २० पैकी दर्शविले जाणार आहेत़ या प्रमाणे तृतीय अंतिम वर्षातील विषयांना गुणदान केले जाणार आहे़ सेमिस्टर पद्धतीतील शिक्षणक्रमांसाठी अंतिम सत्रातील विषयनिहाय गुण हे त्या आधीच्या सत्रातील विषयाचे विषयनिहाय गुण घेवून त्याप्रमाणे दाखवून निकाल लावण्यात येणार आहे़
नांदेड विभागात २२ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या चार जिल्ह्यात बी़ ए़, बी़ कॉम़ या पदवी अंतिम वर्षाचे एकूण २० हजार विद्यार्थी आहेत़ तर पदव्युत्तर विषयाचे अडीच हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत, अशी माहिती नांदेड विभागीय कार्यालयातून प्राप्त झाली़