राज्यात यंदा कापसाचे उत्पादन घटणार; पांढऱ्या सोन्यास हमीदरापेक्षा अधिकच भाव मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 06:22 PM2021-11-16T18:22:07+5:302021-11-16T18:25:48+5:30

एकूणच कापसाची मागणी व बाजारातील स्थिती पाहता कापसाचा दर हमीभावापेक्षा कमी येणार नाही असा अंदाज सीसीआयने वर्तविला आहे.

Cotton production in the state will decline this year; The market price will be higher than the guaranteed price | राज्यात यंदा कापसाचे उत्पादन घटणार; पांढऱ्या सोन्यास हमीदरापेक्षा अधिकच भाव मिळणार

राज्यात यंदा कापसाचे उत्पादन घटणार; पांढऱ्या सोन्यास हमीदरापेक्षा अधिकच भाव मिळणार

googlenewsNext

- राजेश निस्ताने
नांदेड : कापसाला बाजारात साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असला तरी राज्यात यावर्षी कापसाचे उत्पादन ३० लाख क्विंटलने घटण्याचा प्राथमिक अंदाज कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘सीसीआय’ने वर्तविला आहे.

सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पाणिग्रही (मुंबई) यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राज्यात या वर्षी ४ कोटी ५० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यापासून ९० लाख रुई गाठी तयार होतील. ३९ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यावर्षी विविध कारणांनी कापसाचे उत्पादन ३० लाख क्विंटलने घटण्याची चिन्हे आहेत.

कापसाचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरने घटले
सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याचे पाहून यावर्षी सोयाबीनचा पेरा शेतकऱ्यांनी अधिक केला. मागच्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरने घटले आहे. याशिवाय ओला दुष्काळ, अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनक्षम नसलेली बियाणे, दुबार-तिबार पेरणीमुळे झालेला विलंब आदी कारणांमुळे कापसाचे उत्पादन घटणार आहे. एक-दोन वेचणीतच कापसाची उलंगवाडी होत असल्याचे अनेक भागांतील चित्र आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघतो की नाही याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. गेल्या वर्षी ४ कोटी ७९ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले होते. त्यातून ९५ लाख ८८ हजार रुई गाठी तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी कापूस उत्पादनात, पर्यायाने रुई गाठींच्या संख्येत घट होणार असल्याचे पाणिग्रही यांनी सांगितले.

दरातील तेजी कायम राहणार
कापसाचा बाजार सध्या तेजीत आहे. साडेआठ ते नऊ हजार रुपये दर चांगल्या प्रतीच्या कापसाला मिळत आहे. एकूणच कापसाची मागणी व बाजारातील स्थिती पाहता कापसाचा दर हमीभावापेक्षा कमी येणार नाही असा अंदाज सीसीआयने वर्तविला आहे. त्यामुळे शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची वेळ येणार नाही असे दिसते. मात्र, तरीही सीसीआय हमीभावाने कापूस खरेदीसाठी सज्ज आहे. गरज पडल्यास मराठवाड्यात ४० ते ४२ खरेदी केंद्रे सुरू करण्याची सज्जता सीसीआयने ठेवली आहे.

Web Title: Cotton production in the state will decline this year; The market price will be higher than the guaranteed price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.