पहिल्याच वेचणीत होतेय कपाशीची पऱ्हाटी; कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 08:07 PM2019-11-19T20:07:59+5:302019-11-19T20:10:19+5:30
सोयाबीननंतर कापसाच्याही उत्पन्नात होतेय मोठी घट
- श्रीनिवास भोसले
नांदेड : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाल्याचे चित्र असताना आता बाधित कपाशीच्या पहिल्याच वेचणीत पºहाट्या होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट होवून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे़
नांदेड जिल्ह्यात खरिपाचे जवळपास सव्वाआठ लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी सर्वाधिक सव्वातीन लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला़ त्यापाठोपाठ जवळपास अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती़ यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने आणि हिवाळ्यात पाणी देता येईल, असा जलसाठाही निर्माण झाला होता़ त्यामुळे शेतकरी समाधानी होता़ परंतु, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे स्वप्न मातीमोल झाले़ अतिवृष्टीने सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झाले असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या पाहणीत लावण्यात आला़
दरम्यान, पावसानंतरही कपाशी हिरवीगार दिसत होती़ तर बोंड लगडलेले पहायला मिळत होते़ तसेच काही ठिकाणी बोंडाची उगवण झाली तिथे मात्र बोंडामधील सरकीतून अंकुर फुटल्याचेही चित्र पहायला मिळाले़ परंतु, सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचे कमीच नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता़
जिल्हा प्रशासनाने कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या सहकार्याने केलेल्या संयुक्त पंचनाम्यातून नुकसानीची अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे़ त्यामध्ये २ लाख ४ हजार १६५ हेक्टरवरील कापसाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक किनवट तालुक्यातील ३९ हजार २५४ हेक्टरवरील कपाशीचे, त्यापाठोपाठ कंधार - ३० हजार ४७५ हेक्टर, लोहा - १५ हजार ५९५ हेक्टर, माहूर - १३ हजार २४९ हेक्टर, हिमायतनगर - १५ हजार ३५ हेक्टर, देगलूर - ८ हजार ५४३ हेक्टर, मुखेड - ८ हजार ४९६ हेक्टर, नांदेड तालुका - २ हजार ३१० हेक्टर, अर्धापूर - २ हजार ४५७, मुदखेड - १ हजार ४४३ हेक्टर, नायगाव - ८ हजार ९७५ हेक्टर, बिलोली - ६ हजार ७३४ हेक्टर, धर्माबाद - ८ हजार २२५ हेक्टर, हदगाव - ८ हजार ८०० हेक्टर, भोकर तालुक्यात १४ हजार ९५३ हेक्टर तर उमरी तालुक्यात १३ हजार ५८ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे़
कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र साडेतीन लाख हेक्टर असून यंदा जवळपास अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली होती़ यंदा पावसाळा चांगला झाल्याने हिवाळ्यात कापसाला पाणी मिळेल आणि उत्पन्न चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती़ परंतु, आॅक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जमिनीतील पाण्याची वापसा होण्यास विलंब झाला तर फुलं, पाते आणि छोट्या बोंडांना पावसाचा मारा होवून ते बाधित झाले़
परिणामी परिपक्व झालेल्या बोंडांची सध्या उगवण झाली असून त्यातील कपाशीची वेचणी सुरू आहे़ परंतु, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेचणीसाठी कपाशी ठेवण्याची गरजच पडणार नाही, असे चित्र पहायला मिळत आहे़ एकरामध्ये दहा ते पंधरा क्विंटल सरासरी कापसाचे उत्पन्न मिळते़ परंतु, अवकाळी पावसामुळे कपाशीचे उत्पन्न निम्म्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही़
उत्पन्नात निम्म्याने घट होण्याची भीती
यंदा पावसाळा चांगला झाल्याने हिवाळ्यात कापसाला पाणी मिळेल आणि उत्पन्न चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती़ परंतु, आॅक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे कपाशीचेही नुकसान झाले़ जमिनीतील पाण्याचा वापसा होण्यास विलंब झाला तर फुलं, पाते आणि छोट्या बोंडांना पावसाचा मारा होवून ते बाधित झाले़ परिणामी परिपक्व झालेल्या बोंडांची सध्या उगवण झाली असून त्यातील वेचणी सुरू आहे़ परंतु, दुसऱ्या आणि किंवा तिसऱ्या वेचणीसाठी कपाशी ठेवण्याची गरजच पडणार नाही, असे चित्र बहुतांश ठिकाणी पहायला मिळत आहे़ जिल्हा प्रशासनाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यातून नुकसानाची अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे़ त्यामध्ये २ लाख ४ हजार १६५ हेक्टरवरील कापसाचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक किनवट तालुक्यातील ३९ हजार २५४ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे़
राज्यपालाने जाहीर केलेल्या मदतीतून खर्चही निघेना
राज्यात अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त झालेला असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे़ दरम्यान, राज्यपालाकडून प्रतिहेक्टरी आठ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे़ या मदतीतून सोयाबीन आणि कपाशीसाठी प्रतिएकरी झालेला खर्च निघणेदेखील कठीण आहे़ अतिवृष्टीनमुळे सोयाबीनसह ज्वारी, मूग, उडीद आणि कपाशीचे नुकसान झाले़ काढणीच्यावेळी पावसाने घाला केल्याने सोयाबीन, मूग, उडीद काळे पडले असून मालाची गुणवत्ता घसरली आहे़ कपाशीची गुणवत्ता घसरली आहे़ बोलक्या बोंडाचे प्रमाण कमी असून बहुतांश ठिकाणी कपाशीच्या बोंडावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ तसेच काळ्या प्रतीचा आणि चिकटलेला कापूस वेचणीसाठी मजूर महिलाही जादा मजुरी घेत आहेत़