दाम्पत्याने पकडले चोरट्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:27 AM2018-03-04T01:27:42+5:302018-03-04T01:27:42+5:30
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन अपार्टमेंटमध्ये चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका अट्टल चोरट्याला दाम्पत्याने मोठ्या हिमतीने पकडले़ जवळपास दोन तासांहून अधिक वेळ या चोरट्याला सिमेंटच्या खांबाला दोरीने बांधून ठेवण्यात आले होते़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन अपार्टमेंटमध्ये चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका अट्टल चोरट्याला दाम्पत्याने मोठ्या हिमतीने पकडले़ जवळपास दोन तासांहून अधिक वेळ या चोरट्याला सिमेंटच्या खांबाला दोरीने बांधून ठेवण्यात आले होते़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़
भाग्यनगर हद्दीतील गजानन अपार्टमेंटमध्ये मानेजी इबितवार हे पत्नीसह राहतात़ मानेजी हे अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत़ शुक्रवारी रात्री मानेजी हे अपार्टमेंटच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर होते़ तर त्यांच्या पत्नी घरात झोपलेल्या होत्या़ झोपण्यापूर्वी त्यांच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता़ रात्री दोन वाजेच्या सुमारास शैलेश ऊर्फ खन्या नवनाथ सावंत (वय २७, रा़ तळणी) हा अट्टल गुन्हेगार मागील भिंतीवरुन अपार्टमेंटमध्ये शिरला़ यावेळी त्याने मानेजी यांची नजर चुकवून त्यांच्या घरात प्रवेश केला़ घरात झोपलेल्या मानेजी यांच्या पत्नीला आवाजाने जाग आली़
त्यांनी डोळे उघडून पाहिले असता, घरात चोर शिरल्याचे त्यांना दिसले़ यावेळी मोठ्या हिमतीने त्या आवाज न करता घराबाहेर आल्या़ लगेच मानेजी यांना इशाºयानेच त्यांनी घरात चोर शिरल्याचे खुणावले़ त्यानंतर मानेजी यांनी खोलीकडे धाव घेतली़ यावेळी दोघा पती-पत्नीने खन्याला पकडले़ खन्यानेही विरोध केला, परंतु इबितवार दाम्पत्याने खन्याला खाली पाडले़ यावेळी मानेजी खन्याच्या छातीवर बसले अन् त्यांच्या पत्नीने दोरखंड आणला़ त्यानंतर अपार्टमेंटमधील सिमेंटच्या पिल्लरलाच खन्याला बांधून ठेवण्यात आले़ चोरटा पकडल्यानंतर मानेजी यांनी आरडाओरड करुन अपार्टमेंटमधील इतरांना उठविले़ लगेच भाग्यनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली़ पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जवळपास तासभर चोरट्याला बांधून ठेवण्यात आले होते़ यावेळी काही जणांनी चोरट्यांची यथेच्छ धुलाईही केली होती़ पोलिसांनी आरोपी शैलेश ऊर्फ खन्या सावंत याला ताब्यात घेतले़ त्याच्याविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला़