चोरट्यांची हिम्मत! तब्बल १०० किलो वजनाचे कोल्हापुरी बंधाऱ्याचे १७ दरवाजे लांबविले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:56 PM2023-04-12T15:56:28+5:302023-04-12T15:56:58+5:30
तुप्पा येथील पाटबंधारे वसाहतीतील मोकळ्या जागेत कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोखंडी गेट ठेवण्यात आले होते.
नांदेड: अरे बापरे! चोरट्यांची हिम्मत वरचेवर प्रचंड वाढत असून, आता चोरट्यांनी तुप्पा (ता. नांदेड) येथील जलसंपदा वसाहतीतील तब्बल १०० किलो वजनाचे कोल्हापुरी बंधाऱ्याचे १ लाख २ हजार रूपयांचे १७ गेट चोरुन नेले. ही घटना ७ एप्रिलच्या रात्री साडेअकरा ते ८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान घडली. मात्र, याप्रकरणी नांदेड 'ग्रामीण' ठाण्यात ११ एप्रिल रोजी आरोपी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदेड-हैद्राबाद रस्त्यावरील तुप्पा परिसरात पाटबंधारे वसाहत आहे. तुप्पा येथील पाटबंधारे वसाहतीतील मोकळ्या जागेत कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोखंडी गेट ठेवण्यात आले होते. दरम्यान, चोरट्यांनी सुवर्णसंधी साधून ७ एप्रिलच्या रात्री साडेअकरा ते ८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्यादरम्यान, तुप्पा येथील पाटबंधारे वसाहतीतील मोकळ्या जागेत ठेवलेले तब्बल १७ गेट चोरून नेले. चोरीला गेलेल्या बंधाऱ्याच्या १७ लोखंडी गेटचे वजन प्रत्येकी १०० किलो असून, किंमत प्रत्येकी ६ हजार रूपये असल्याची माहिती सहाय्यक अभियंता फरमान पिता नसीर बागवान यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्येच नमूद असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व जुबेर चाऊस यांनी दिली आहे.
याप्रकरणी सहाय्यक अभियंता फरमान पिता नसीर बागवान यांनी कार्यालयातील अभिलेख तपासून अखेर ११ एप्रिल रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक अभियंता बागवान यांच्या तक्रारीआधारे आरोपी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार मांजरमकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.