चंद्राबाबू नायडूंना २१ सप्टेंबरपर्यंत स्वत:हून धर्माबाद न्यायालयात हजर होण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:50 PM2018-09-14T18:50:32+5:302018-09-14T18:57:45+5:30
तब्बल ३० वेळेस नोटीस बजावूनही नायडू यांच्यासह १६ कार्यकर्ते हजर न झाल्याने त्यांना न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे.
धर्माबाद (नांदेड) : बाभळी बंधारा आंदोलन प्रकरणावेळी कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व किरकोळ जखमी केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह १६ जणांवर २०१० मध्ये गुन्हा दाखल आहे. सदरप्रकरणी तब्बल ३० वेळेस नोटीस बजावूनही नायडू यांच्यासह सदर १६ कार्यकर्ते न्यायालयात हजर न झाल्याने त्यांना न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. दरम्यान, येत्या २१ सप्टेंबरपर्यंत त्यांनी स्वत:हून न्यायालयात उपस्थित व्हावे, अन्यथा पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर करावे, अशी नोटीसही आंध्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बजावली आहे.
काय आहे प्रकरण
महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्र प्रदेशच्या हद्दीवर असलेल्या गोदावरी नदी पाणीवाटपावरून दोन्ही राज्य सरकारमध्ये २०१० मध्ये मोठा वाद निर्माण झाला होता़ यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांसह धर्माबादनजीकच्या बाभळी बंधाऱ्याकडे येण्यासाठी निघाले होते़ तणावाची परिस्थिती पाहून पोलीस प्रशासनाने बंधारा परिसरात जमावबंदी आदेश लागू केला होता़ मात्र आदेशाला धाब्यावर बसवित नायडू हे महाराष्ट्र सीमेकडे निघाले़ सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही कायद्याचे उल्लंघन करीत ते महाराष्ट्र सीमेच्या आत घुसले़ यावेळी प्रशासनाने ६३ जणांना ताब्यात घेऊन धर्माबाद येथील आयटीआयमध्ये चार दिवस ठेवले होते.
पोलिसांना केली होती धक्काबुक्की
या आयटीआयलाच तात्पुरत्या कारागृहाचे स्वरूप देण्यात आले होते त्यानंतर २० जुलै २०१० रोजी त्यांना औरंगाबाद कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले़ या आदेशानुसार कारागृहात हलविण्याची प्रक्रिया सुरू असताना चंद्राबाबू नायडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाण्यास नकार देत कारागृहातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली़ तसेच तेलगू आणि इंग्रजी भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली़ या प्रकाराबाबत तत्कालीन वरिष्ठ तुरूंग अधिकारी किशन गोपीनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ३२४, ३३२, ३३६, ३३७, ३५३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला होता.
न्यायालयाने हजर राहण्याचे दिले आदेश
२०१० मधील हे प्र्रकरण आता धर्माबाद कनिष्ठ न्यायालयात सुनावणीला आले आहे़ दोषारोप पाहून न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना तब्बल ३० वेळेस नोटीस बजावली़ मात्र त्यानंतरही नायडूसह त्यांचे साथीदार न्यायालयात हजर झालेले नाहीत़ त्यामुळे चंद्राबाबू नायडू, मीक़मलाकर, के़एस़एऩएस़ राजू, सी़एच़ प्रभाकर, एऩनागेश्वर मल्लेशम, जी़राम नायडू, जी़उमा महेश्वरराव, सी़एच़विजय रामराव, मुजफरोद्दीन अमीरोद्दीन, हणमंत शिंदे, पी़माधप्पा, पी़अब्दुलखान सुलखान, एस़सोमजोजू, ए़एस़रत्नम (सायन्ना), पी़सत्यनारायण शिंदू, टी़प्रकाश, गौडगोडीया, एऩआनंदबाबू, पी़नागेंद्रम या १६ जणांना न्यायालयाने आता अटक वॉरंट बजावले आहे़ याबरोबरच २१ सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू स्वत:हून हजर न झाल्यास त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर करावे, अशा आशयाच्या नोटिसा महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेशच्या पोलिसांनाही बजावण्यात आल्या आहेत़
तब्बल ३० वेळा बजावली नोटीस
बाभळी बंधाराप्रकरणी आंदोलनादरम्यान धर्माबाद येथील तात्पुरत्या कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण तसेच शिवीगाळ केल्याची घटना घडली होती़ २०१० मध्ये गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह इतर १५ कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी धर्माबाद न्यायालयाने तब्बल ३० वेळा नोटीस बजावली़ मात्र त्यानंतरही वरील १६ जण न्यायालयात राहिले नाहीत़ त्यानंतर आता न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेतला आहे़