मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 11:52 AM2022-02-04T11:52:58+5:302022-02-04T11:55:04+5:30

Corona vaccine मराठवाड्यातील तब्बल ४ लाख ८३ हजार ५४८ विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा असून ३१ जानेवारीपर्यंत ५ लाख ५२ हजार ६१२ जण लसवंत झाले आहेत.

Covaxin shortage in Marathwada delays student vaccination; Five and a half lakh students are waiting for vaccination | मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा

मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा

googlenewsNext

- श्रीनिवास भोसले
नांदेड : नववर्षाच्या प्रारंभापासून विद्यार्थ्यांचे लसीकरणास ( Corona Vaccination ) सुरुवात केली. मात्र, १५ वर्षांपुढील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कोव्हॅक्सिनचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले आहे. (Covaxin shortage in Marathwada delays student vaccination) 

मराठवाड्यातील तब्बल ४ लाख ८३ हजार ५४८ विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा असून ३१ जानेवारीपर्यंत ५ लाख ५२ हजार ६१२ जण लसवंत झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण हाच उपाय असल्याचा गाजावाजा करत प्रशासनाने लसीकरणाला गती दिली. त्यात ज्या पद्धतीने तिसऱ्या लाटेची भीती घालण्यात आली, तेवढ्याच झपाट्याने तिसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. याकाळात लसीकरणाची गती चांगली वाढली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारीपासून १५ वर्षांपुढील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. खास विद्यार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिनच देण्यात येत होते. नांदेड जिल्ह्यात प्रशासनाने पहिल्याच आठवड्यात लसीकरण शिबिरांचे आयोजन करून अपेक्षित टप्पा पूर्ण करून घेतला. दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने लसीकरणाला ब्रेक लागला होता. त्यानंतर पुन्हा मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आली. 

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटात जवळपास १ लाख ८१ हजार ९७२ जणांचे लसीकरण अपेक्षित आहे. त्यापैकी ३१ जानेवारीपर्यंत ८९ हजार ३५१ जणांचे लसीकरण झाले आहे. तर, दुसरा डोस केवळ ६३ जणांनी घेतला आहे. दरम्यान, पुन्हा मागील काही दिवसांपासून कोव्हॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. केवळ नांदेडमध्येच नव्हे तर, संपूर्ण राज्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. पुढील आठवडाभर कोव्हॅक्सिन उपलब्ध होणार नसल्याचेही लसीकरण केंद्रातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणात औरंगाबाद पिछाडीवर
१५ ते १८ वयोगटात मराठवाड्यात सर्वाधिक लातूर जिल्ह्यात लसीकरण झाले आहे. १ लाख ३४ हजार ३१४ पैकी ८७ हजार ६३८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, सर्वात कमी औरंगाबादमध्ये २ लाख १३ हजार ८२३ पैकी १ लाख १ हजार ८२८ जणांना लस दिली. हिंगोलीमध्ये ६५,०६८ पैकी ३५,०२७, परभणी- १,०१,८९५ पैकी ५७,०८५, जालना - १,०९,४२८ पैकी ६२,२९३, उस्मानाबाद - ८६,८३१ पैकी ४३,२०५ तर, बीड जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ९१९ पैकी ७६ हजार १८५ जणांना पहिला डोस दिला आहे.

ऐन परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांची धावपळ
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन- ऑफलाईनचा घोळ सुरू असताना ऐन परीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांसाठीच्या कोव्हॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी लसीकरण अनिवार्य केले तर, हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे. त्यात लस घेतल्यानंतर काही दिवस ताप, अंगदुखी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तत्काळ लस उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Covaxin shortage in Marathwada delays student vaccination; Five and a half lakh students are waiting for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.