कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:18 AM2021-04-01T04:18:40+5:302021-04-01T04:18:40+5:30
केंद्रेकर यांनी घेतली ठाकूर यांची भेट नांदेड - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बुधवारी नांदेड दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या ...
केंद्रेकर यांनी घेतली ठाकूर यांची भेट
नांदेड - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बुधवारी नांदेड दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देवून ठाकूर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर उपस्थित होते. वर्षा ठाकूर कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
नेटवर्कअभावी अडचणी
शिवणी - परिसरातील फोरजी सेवेचे चार टॉवर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे डझनभर गावामध्ये नेटवर्कची समस्या निर्माण झाली. कंपनीच्या संबंधितांनी टॉवरचे उद्घाटन लवकरात लवकर करावे अशी मागणी होत आहे.
सरपंचपदी पानपट्टे
किनवट - तालुक्यातील रिठा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप पानपट्टे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतवर राम जाधव यांच्या पॅनलचे वर्चस्व आहे.
तरुणाची आत्महत्या
किनवट - गोकुंदा येथील ज्ञानेश्वर शंकर मोहजे (वय ३०) यांनी २९ मार्च रोजी रात्री राहत्या घरी लाकडी नाटीला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळाले नाही. किनवट पोलिसांनी गजानन मोहजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. पो.ना.चौधरी तपास करीत आहेत.
जीवघेणा हल्ला
नायगाव - सातबाराच्या कारणावरून एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमठाणा येथे घडली. मारोती कदम हे होळी खेळून आरोपीच्या घरी पाणी पिण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने शेतीचा सातबारा माझ्या नावावर का केला नाही म्हणून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. कुंटूर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
प्रस्तावित निवडणूक स्थगीत
नांदेड - पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीची प्रस्तावित निवडणूक स्थगीत करण्यात आली. १०एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. तथापि कोरोनामुळे ती स्थगीत करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गोविंद मुंदडा व संस्थेचे सचिव शामल पत्की यांनी दिली.
सावता परिषदेची मागणी
अर्धापूर - क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरून महापुरुषाची बदनामी करणारे शिक्षक अप्पा हातनुरे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांनी केली. निवेदनावर संदीप राऊत, लवराज माटे, गणेश वंजे, विशाल गोराटे आदींची नावे आहेत.
दुचाकी अपघातात एक जखमी
किनवट - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळकोल्हारी गावाजवळ दुचाकीचा अपघात होवून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. एम.एच.२६-डब्ल्यू.४२५३ या क्रमांकाची दुचाकी हाेती. घटनेची माहिती मिळताच संतोष पेळे, सुरेश पाटील, माधव खल्लारे यांनी घटनास्थळी भेट देवून जखमी दीपक शेळके यांना उपचारासाठी नांदेडला हलवले.
कोरोनाची होळी
देगलूर - तालुक्यातील करडखेड येथे यावेळी कोरोना घालवण्यासाठी होळी पेटवण्यात आली. यावेळी ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी बालाजी इबितवार, अहमद चौधरी, बालाजी खुणेवाड, संभाजी जाधव, मारोती अंकतवार आदी उपस्थित होते.
पाणी मशीनचे उद्घाटन
बिलोली - बोळेगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंच राधिका बोधनापोड यांच्या हस्ते फिल्टर पाण्याचे उद्घाटन ३० मार्च रोजी करण्यात आले. सकाळी ५ ते १० व सायंकाळी ५ ते१० या वेळेत पाणी मोफत राहील. कार्यक्रमाला उपसरपंच चिंतले, सदस्य सुरेश गोणेकर, विठ्ठल तुकडेकर, रेड्डी गडापोड, शंकर गडापोड, व्यंकट गोणेकर, गणेश उसेकोड, संगमेश्वर देशमुख, शंकर यंकमवार, सुरेश बसवंते, प्रकाश मोघे आदी उपस्थित होते.