कोविड योद्धांची आर्थिक रसदच तोडली; निवासी डॉक्टर दोन महिन्यांपासून विद्यावेतना विना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 06:57 PM2020-08-11T18:57:56+5:302020-08-11T19:00:22+5:30
जून आणि जुलै या दोन महिन्यांचे विद्या वेतन थकविण्यात आले आहे़
नांदेड- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आरोग्य सेवेची प्रत्यक्ष जबाबदारी असलेल्या निवासी डॉक्टरांचा शासनाने कोविड योद्धा म्हणून गौरव केला आहे़ परंतु या कोविड योद्धांची आर्थिक रसदच गेल्या दोन महिन्यांपासून तोडण्यात आली आहे़ विद्यावेतन मिळत नसल्याने निवासी डॉक्टर आता मेटाकुटीला आले आहेत़ नांदेड, लातूर, औरंगाबाद आणि मिरज या चार महाविद्यालय व रुग्णालयात असाच प्रकार आहे़
कोरोनाच्या संकटामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टांवरील कामाचा ताण वाढला आहे़ या डॉक्टरांवरच रुग्णालयातील आरोग्य सेवा अवलंबून आहे़ या निवासी डॉक्टरांना महिन्याकाठी साधारणत: ५३ हजारांचे विद्या वेतन मिळते़ परंतु जून आणि जुलै या दोन महिन्यांचे विद्या वेतन थकविण्यात आले आहे़ राज्य शासनाने निवासी डॉक्टरांना कोरोनाच्या काळात विद्यावेतनात दहा हजारांची वाढ करण्याची घोषणा केली होती़ परंतु त्यातील छदामही या निवासी डॉक्टरांच्या हाती अद्याप पडलेला नाही़ नांदेड येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आजघडीला १५५ निवासी डॉक्टर आहेत़ तर औरंगाबादला ४९०, लातूरला १७४ आणि मिरजला १७४ निवासी डॉक्टर विद्या वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत़ विद्या वेतन मिळत नसल्यामुळे या कोविड योद्धांची मोठी पंचाईत झाली आहे़
शासनाकडून केवळ आश्वासनेच
कोविड योद्धा म्हणून एकीकडे आमचा गौरव करायचा अन् दुसरीकडे आर्थिक नाकेबंदी करायची़ असे शासनाचे धोरण आहे़ कोविडवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना प्रत्यक्ष सेवा बजाविणाऱ्या निवासी डॉक्टरांनाच विद्या वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे़ याबाबत शासन दप्तरी अनेकवेळा मुद्दा मांडला़ परंतु केवळ आश्वासनेच मिळत आहेत़ त्यामुळे पुढील काळात मार्ड संघटनेच्या वतीने वेगळे पाऊल उचलण्याची तयारी करण्यात येत आहे़
- डॉ़प्रणव जाधव, अध्यक्ष मार्ड संघटना नांदेड़
प्रस्ताव पाठविला आहे
निवासी डॉक्टरांच्या वेतनाच्या संदर्भाने संचालक कार्यालय आणि शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ त्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे़ येत्या काही दिवसात निवासी डॉक्टरांना त्यांचे विद्या वेतन मिळणार आहे़ - डॉ़सुधीर देशमुख, अधिष्ठाता़