नववधूचा श्रृंगार करून करिश्मावर झाले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:54 PM2018-01-29T23:54:45+5:302018-01-29T23:54:58+5:30
येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणा-या करिश्मा नरवाडे हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली़ तिच्या अंतिम इच्छेनुसार नववधूचा श्रृंगार करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणा-या करिश्मा नरवाडे हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली़ तिच्या अंतिम इच्छेनुसार नववधूचा श्रृंगार करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
करिश्माची आत्महत्या सर्वांनाच हुरहुर लावून गेली़ तिला दहावीमध्ये ८६ टक्के गुण होते़ ती १२ वीत विज्ञान शाखेत होती़ २६ जानेवारी रोजी ती गावाकडे गेली़ रविवारी फोनवर तिच्या आईशी बोलली़ यावेळी तिने नांदेडला येवून आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली़ मात्र परीक्षा जवळ आली, फिरू नकोस़ पुढच्या रविवारी नांदेडला ये असे तिच्या आईने सांगितल्याने ती काहीशी नाराज झाली़
सोमवारी ती वहीमध्ये काहीतरी लिहित होती़ यावेळी तिच्या मैत्रिणीने काय लिहितेस असे विचारले़ मात्र करिश्माने मैत्रिणीच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही़ काही नाही असेच लिहितेय म्हणून तिने मैत्रिणीचा प्रश्न टाळला़ त्यानंतर रविवारी तिने या जगाचा निरोप घेतला़ सोमवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी १२ वाजता तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़
त्यानंतर मरडगा येथे तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले़ तत्पूर्वी नवरीसारखे नटवून माझा अंत्यविधी करावी ही तिची शेवटची इच्छा होती़ त्याप्रमाणे कुटुंबियांनी तिची अंतिम इच्छा पूर्ण केली़ नववधूप्रमाणे तिला लग्नाची लाल साडी, चुनरी नेसविण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते़ जो-तो करिश्माच्या अशा अचानक जाण्यामुळे हळहळ व्यक्त करीत होता़
मृत्यूपूर्वी करिश्माने आठ पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती़ या चिठ्ठीतील मजकूर वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले़ करिश्माने लिहिलेल्या चिठ्ठीतील अक्षर वळणदार होते़ तिची समज बघून अधिकारीही थक्क झाले़ तिला आई भेटली असती तर कदाचित ती आज जिवंत राहिली असती़
करिअरची काळजी करू नको, विज्ञान शाखा सोड व कलेमध्ये चांगले गुण मिळव असा सल्ला देवून कोणी मार्ग दाखवला असता तरीही करिश्मा जिवंत राहिली असती, असेही बोलले जात आहे़
दहा वर्षांपासून आईची भेट नाही़!
मला दहा वर्षांपासून आई भेटली नाही़ मी कालही तिला फोन करून हॉस्टेलला बोलावले; पण तिने येण्यास नकार दिला़ त्यामुळे माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही़ दारूमुळे बाबा दगावले व आईने आम्ही तीन मुली असतानाही दोनच मुली आहेत असे सांगून मला नाकारले़ मला यावर्षी कमी मार्क्स पडतात, पुढील शिक्षणाचा खर्च कोण करणार, मला मार्क कमी पडले की माझे लग्नच करून देणार, त्यामुळे माझ्या करिअरचे काय? बाबाकडील नातेवाईक आईच्या विरूद्ध होते, तर मी आजी, आत्या, काकांना जीव लावते म्हणून आई माझ्या विरोधात होती़ माझे करिअर मनासारखे घडत नाही म्हणून मेलेलेच बरे़ काकांनी माझ्या अंत्यविधीनंतर दारू सोडून द्यावी़