'या' शेतकऱ्यांना स्मशानभूमी ठरतेय वरदान; पावसापासून लाख मोलाच्या शेतमालाचे होतेय संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 02:02 PM2021-10-08T14:02:33+5:302021-10-08T14:10:15+5:30
अंत्यविधी एकही झाला नाही पण सोयाबीन ठेवण्यासाठी होतोय उपयोग
- सुनील चौरे
हदगाव ( नांदेड ) : सततच्या पावसामुळे ( Heavy Rainfall in Nanded ) तालुक्यातील सोयाबीन काढणी खोळंबली आहे. जस जमेल तसं शेतकरी पिक काढून घेत आहेत. मात्र, पावसाचा तडाखा सुरुच आहे. यावेळी केदारनाथ येथिल ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत बांधलेली स्मशानभूमी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतकरी काढलेले सोयाबीन येथेच पावसापासून रक्षण करण्यासाठी साठवून ठेवत आहेत. ( crematorium became boon to 'this' farmers )
सन २०१०-११ मध्ये बांधलेल्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत या स्मशानभूमीत अद्याप एकही अंत्यविधी झाला नाही. या स्मशानभूमीसमोर खंडु बाजीराव भिसे आणि त्यांच्या भावांची शेती आहे. त्यांना आठ एकर जमीन आहे. शेतीच्या बाजूने नाला आहे. शेतात मळणी यंत्र जात नाही. रस्त्यावर सोयाबीनसजा ढिग करण्यासाठी मुबलक जागा नाही. पण शेतासमोरील बांधलेली स्मशानभूमी रिकामीच असल्याने यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण सोयाबीन येथे आणून जमा केले तर पावसामुळे होणारे नुकसान टाळता येईल. रस्त्यावर सोयाबीन आल्याने मळणी यंत्र ही मिळेल. दिड किमी डोक्यावर सोयाबिन घेऊन दिवसभर आठ दहा चक्करा करत चारही भावांनी सोयाबीन स्मशानभूमीतील सुरक्षित स्थळी ठेवले आहे. पीक सुरक्षित असल्याने त्याचे समाधान या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागले आहे.
स्मशानभूमी ठरतेय वरदान
अतिवृष्टी झाली नसती तर मळणी यंत्र शेतात आले असते. पण दोन वर्षांपासून आम्हाला स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत आहे. खरं तर ग्रामीण भागात स्मशानभूमीकडे कोणी सहसा फिरकतच नाही. पण केदारनाथ येथील स्मशानभूमी शेतकऱ्यांना मदत करीत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी आता मागे पुढे या स्मशानभूमीचा उपयोग घेत आहेत. आता हिरवं असलेल सोयाबीन बाजुला काढून दोन दिवस वाळवता येईल. दोन चार दिवस मळणी यंत्र नाही मिळाले तरी अडचण नाही असे खंडु भिसे म्हणाले.