वाळू घाटाच्या लिलावधारकांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:41 AM2019-06-20T00:41:43+5:302019-06-20T00:43:04+5:30
शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरी/नायगाव : शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेळगाव ता. नायगाव येथील लिलावधारकावरही गुन्हे नोंदविण्यात आले.
कौडगाव येथील लिलाव धारक लोकडेश्वर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दत्तात्रय बापूराव जाधव (रा.नायगाव ता. नायगाव जि. नांदेड), येंडाळा वाळूघाट लिलावधारक ओमकार कन्स्ट्रक्शनचे दादाराव ढगे (रा. पिंपळकौठा ता. मुदखेड जि. नांदेड) व महाटी वाळू घाटाचे लिलावधारक विष्णू शंकर नारणवार (रा. उमरी दहिगाव ता. माळशिरस जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन लिलावधारकांची नावे आहेत. याप्रकरणी मंडळ अधिकारी अर्जुन पवार यांनी पोलिसात तक्रार दिली.
वाळू उत्खननाची परवानगी मिळाल्यावर लिलाव धारकांनी गोदावरी नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करण्यास सुरुवात केली. मात्र परवानगीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिकचा वाळू उपसा करण्यात आला. या बाबींची शहानिशा करण्यासाठी शासनाने या तीनही वाळू घाटांच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी साठा केलेल्या वाळूची तपासणी केली व पंचनामा केला. या सर्व वाळूसाठ्याची ६ जून रोजी ईटीएस प्रणालीद्वारे मोजणी करण्यात आली. या ईटीएस मोजणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्याद्वारे वाळू उत्खननाचे पितळ उघडे पडले. कौडगाव वाळू घाटाचा लिलाव २३ एप्रिल रोजी झाला. या वाळू घाटावरून ३०९२ ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी शासनाने दिली होती.
मेळगाव ता. नायगाव येथील लिलावधारक ज्ञानेश्वर दिगंरब कळसे यांच्याविरुद्ध कुंटूर पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
दरम्यान, उमरी व नायगाव तालुक्यात सर्व रेतीसाठ्याची मोजणी महसूल विभागाने केली आहे. ज्या खाजगी जमिनीच्या गटातून रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. अशा सर्व खाजगी जमीनधारकाविरुद्धही दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. दंडाची रक्कम वसूल न झाल्यास त्यांच्या जमिनीवर बोजा टाकण्याची कारवाई उमरी व नायगाव तहसीलदारामार्फत करण्यात येत आहे. खाजगी जमीनधारकांनी रितसर परवानगी घेवून साठे केले आहेत का? त्यांच्याकडे बारकोडयुक्त पावती व रेतीघाट धारकाकडून रेती खरेदी केल्याच्या कायदेशीर पावत्या आहेत का? याची तपासणी केली जाणार जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
परवानगीपेक्षा जास्त वाळूचा उपसा,पर्यावरणाचे भारी नुकसान
- संबंधित लिलाव धारकाने शासनाने परवानगी दिलेल्या प्रमाणापेक्षा १२ हजार ६१६ .४० ब्रास जास्तीचा वाळू उपसा केला. ज्याची किंमत ५ कोटी २६ लाख ७३ हजार ४७० रुपये एवढी होते.
- महाटी येथील वाळू घाटाचा लिलाव २३ एप्रिल रोजी झाला. या वाळू घाटाच्या लिलाव धारकास शासनाने २८७१ ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी दिली होती. मात्र या लिलाव धारकाने शासनाने परवानगी दिलेल्या प्रमाणापेक्षा ६३६६.४० ब्रास जास्तीच्या वाळूचे उत्खनन केले. ज्याची किंमत २ कोटी ६५ लाख ७९ हजार ७२० रुपये एवढी होते. येंडाळा वाळू घाटाचा लिलाव २२ मे रोजी झाला.
- सदर लिलाव धारकाला गोदावरी नदीपात्रातून २८६२ ब्रास वाळू उत्खनन करण्याची परवानगी दिली,मात्र संबंधिताने या प्रमाणापेक्षा ११ हजार ९५०.७४ ब्रास एवढ्या जास्तीचे वाळू उत्खनन केले. या वाळूची किंमत ४ कोटी ९८ लाख ९४ हजार ३३९ रुपये एवढी होते. अशाप्रकारे वरील तीनही वाळू घाटांच्या लिलाव धारकांनी एकूण ३० हजार ९३३ .५४ ब्रास एवढ्या वाळूची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. वाळूची चोरी, नियमाचा भंग तसेच पर्यावरणाचे नुकसान केल्याचा आरोप या वाळूघाट धारकांवर करण्यात आला
- मंडळ अधिकारी अर्जुन पवार यांनी उमरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तिनही वाळूघाट लिलाव धारकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन इंद्राळे तपास करीत आहेत.