कोरोना तपासणीसाठी जादा पैसे घेणाऱ्या लॅब चालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:19+5:302021-04-04T04:18:19+5:30
शहरात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. कोरोना तपासणीच्या नावाखालीही खासगी लॅबकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली जात आहे. ...
शहरात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. कोरोना तपासणीच्या नावाखालीही खासगी लॅबकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली जात आहे. विशेष म्हणजे शासनाने कोरोना तपासणीसाठी दर निश्चित केले आहेत. असे असतानाही जादा रक्कम उकळली जात होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर या तक्रारीची शहानिशा केली असता थॅरोकेअर लॅबने नागरिकांकडून कोरोना तपासणीसाठी २ हजार रुपये घेतले होते. तीन रुग्णांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी महापालिका प्रशासनाला थॅरोकेअर लॅबवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर शुक्रवारी रात्री महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसने यांच्या तक्रारीवरुन थॅरोकेअर लॅबचे संचालक शशिकांत चंद्रकांत शेळके व टेक्निशियन आनंद राजाभाऊ बोकन या दोघांविरुद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याचवेळी ही लॅब महापालिकेने सीलही केली आहे. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बदियोद्दीन, क्षेत्रिय अधिकारी डॉ. रईसोद्दीन, गणेश परडे आदींची उपस्थिती होती.
कारवाई सुरूच राहणार- डॉ. विपीन
कोरोनाच्या संकट काळात नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र असे असताना वैद्यकीय क्षेत्रातील काही जणांकडून नागरिकांची लूट सुरू आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रशासनाकडून या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात येत आहे शहानिशा करुन गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले.