चार न्यायाधीशांसह कुटुंबातील सात सदस्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 06:00 AM2018-06-23T06:00:00+5:302018-06-23T06:00:00+5:30
हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेस शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन कार्यरत न्यायाधीश, एक निवड झालेले न्यायाधीश, दोन वकील आणि दोन महिला अशा ७ जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड : हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेस शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन कार्यरत न्यायाधीश, एक निवड झालेले न्यायाधीश, दोन वकील आणि दोन महिला अशा ७ जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेचे वडील मुंबईत न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलअफशार सुलताना बेगम शेख वसीम (२५, रा. रा. पांडरकोडा कालापूर, जि. यवतमाळ मु. हाजीअली शासकीय वसाहत, मुंबई) यांचा विवाह शेख वसीम अक्रम शेख महमद जलाल (रा. पांडरकोडा कालापूर, जि. यवतमाळ) यांच्याशी ११ डिसेंबर २०१६ रोजी झाला. गुलअफशार यांचे मूळ घर नांदेड शहरातील इतवारा भागात आहे. लग्नानंतर काही दिवस संसार ठीक चालला. मात्र त्यानंतर शेख वसीम आणि गुलअफशार यांच्यात बेबनाव झाला. पती-पत्नीचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न झाला. परंतु यश आले नाही.
अखेर २१ जून रोजी गुलअफशार यांनी सात जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. यावरून इतवारा पोलिसांनी ३ न्यायाधीश, १ न्यायाधीश निवड झालेली व्यक्ती, १ वकील, २ महिला अशा ७ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाची कलमे ३९५, ४९८, (अ), १२० (ब), ३५४, ५०४, ५०६, ३९५, ३५४ आणि कलम ४ हुंडाबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर सांळुके यांना देण्यात आला आहे.
काय आहे तक्रार
विवाहापूर्वी व विवाहानंतर आरोपींनी वडिलांकडे वारंवार ११ लाख ५० हजारांची मागणी केली. यासाठी शिवीगाळ करुन धमकीही दिली. याबरोबरच चाकूचा धाक दाखवून पर्समधून २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.
गुन्हा कोणावर दाखल
न्या. शेख वासीम अक्रम (रा. पांडरकोडा कालापूर, जि. यवतमाळ), त्यांचे भाऊ न्या. शेख अमिर शेख जलाल (रा. हातसांगवी, जि. जालना) त्यांचे न्यायाधीश असलेले भाऊजी शेख जावेद सिद्दीकी (रा. माहूर, जि. नांदेड), न्यायाधीश परीक्षा पास झालेले शेख जुनेद शेख जलाल (रा. देगलूरनाका, नांदेड), वकील असलेले शेख वासीम यांचे वडील मोहम्मद जलाल शेख कासीम पटेल, आई अफसरी बेगम शेख जलाल (रा. देगलूर नाका, नांदेड) आणि वासीम अक्रम यांची बहिण शेख करानाज शेख जावेद सिद्दीकी (रा. माहूर, जि. नांदेड) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.