गैरहजर राहणाऱ्या बारा पोलिसांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:03 AM2019-05-08T01:03:48+5:302019-05-08T01:04:08+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदान बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाºयांना सोलापूर तर काही कर्मचाºयांना सातरा येथे निवडणूक ड्युटीवर पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील कर्मचा-यांसह अन्य शाखेतील जवळपास ४०० कर्मचाºयांचा यामध्ये समावेश होता. या ४०० पैकी २५० पोलीस कर्मचारी सातारा येथे पाठविण्यात आले होते. परंतु त्यातील १२ पोलीस कर्मचाºयांनी निवडणूक बंदोबस्ताला गैरहजेरी लावली. या अनुषंगाने सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नांदेड पोलीस अधीक्षकांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सदर प्रकाराची गंभीर दाखल घेतली. निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने सदर १२ कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकांस त्यांनी दिल्या. यावरुन लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ (१) नुसार या कर्मचाºयावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कारवाई झालेल्या कर्मचा-यांमध्ये गुलाब आडे (हिमायतनगर), कृष्णा मोतीराम चनोडे (मांडवी), बाबूराव सूर्यवंशी (देगलूर), हुजूरीया (वजिराबाद ठाणे), विजय कोंडजे धुंळगंडे (कंधार), सादिक पठाण (शहर वाहतूक शाखा, नांदेड), मुन्वर हुसेन (शहर वाहतूक शाखा, नांदेड), गोपाळ तोटलवार (शिवाजीनगर), देवानंद मोरे (लिंबगांव), राजू कांबळे (मुखेड) आणि मिलिंद लोणे (विमानतळ) यांचा समावेश आहे.
बसवाहकास मारहाण
तिकीट काढण्याच्या कारणावरुन बस वाहकास मारहाण केल्याची घटना देगलूर येथे ६ मे रोजी घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगलूर येथील नई आबादी येथील बसवाहक गजानन हनुमंत हुगेवाड हे कर्तव्यावर असताना प्रवाशांचे तिकीट काढत होते.बसमध्ये प्रवास करणा-या एका प्रवाशाने तिकीट काढण्याच्या कारणावरुन त्यांच्याशी वाद घातला. या वादात बसवाहक गजानन हुगेवाड यांना आरोपी प्रवाशाने शिवीगाळ करीत थापडबुक्क्याने मारहाण केली. घटनेनंतर मारहाण करणारा प्रवासी तिकीट न काढता पळून गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.