पशुधनावर संकट; ‘लंपी स्कीन’मुळे मुक्या जनावरांतही आता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 07:23 PM2020-08-05T19:23:08+5:302020-08-05T19:28:52+5:30

लाळेचा संपर्क आला तर इतर जनावरांना हा आजार होण्याचा धोका

Crisis on cattle; ‘Lampy skin’ disease now causes ‘physical distance’ even in domestic animals | पशुधनावर संकट; ‘लंपी स्कीन’मुळे मुक्या जनावरांतही आता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

पशुधनावर संकट; ‘लंपी स्कीन’मुळे मुक्या जनावरांतही आता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

Next
ठळक मुद्देजनावरांमध्ये विषाणूजन्य आजाराची लागण होत आहेग्रामीण भागात पशुधनाला संसर्ग झाल्याने चिंता 

- गंगाधर तोगरे

कंधार (जि़नांदेड) :  नागरिक कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कमालीची दक्षता घेत असल्याचे चित्र आहे. त्यातच पशुधनाला ‘लंपी स्कीन’ विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा आजार झालेल्या पशुधनासोबत इतर पशुधन चारा, पाणी घेत असतील. तसेच लाळेचा संपर्क आला तर इतर जनावरांना हा आजार होण्याचा धोका असल्याने पशुधनाचेही विलगीकरण करणे गरजेचे झाले आहे.

तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात विविध आजारांवर उपचार आणि घटसर्प, फऱ्या रोगाच्या लसीसाठी पशुपालक पशुधन घेऊन जात असतात. अनेक ठिकाणी अधिकारी, कर्मचारी संख्या अपुरी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर पशुधनावर उपचार करावे लागतात. साधारणपणे पशुधनाला ताप, वंध्यत्व, पोटफुगी, फऱ्या, गर्भधारणा, घटसर्प, कृत्रिम रेतन, तोंड व पायखुरी आदींसाठी रोगनिदान व उपचारासाठी पशुपालक पशुवैद्यकीय दवाखाने गाठत असतात. सध्या पशुधनाला ‘लंपी  स्कीन ’ नावाचा विषाणूजन्य आजार जडत आहे.  पशुधनाच्या अंगावर फोड येणे, फोड फुटणे, तोंडातून लाळ येणे, चारा न खाणे, ताप आदीने पशुधनाला जखडले आहे. त्यातच उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात  औषधी नसल्याने पशुपालकाला आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्याच्या पशुपालकातून तक्रारी आहेत.  सध्या बारूळ, काटकळंबा, चिंचोली, गोणार, शेकापूर आदी गावांसह ग्रामीण भागात शेकडो पशुधनाला ‘लंपी स्कीन’ हा विषाणूजन्य आजार झाला असल्याचे समोर आले आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधींचा तुटवडा
निसर्गचक्रामुळे शेतीतून मिळकतीचा काही भरवसा राहिला नाही. म्हणून शेतकरी शेतीसाठी काम, विक्री व दुग्धव्यवसायासाठी पशुधन संगोपन संवर्धन करतो. ‘लंपी स्कीन आजारावरील औषधीसाठी मोठा खर्च लागत आहे. माझ्याकडील २० पेक्षा अधिक जनावरांच्या उपचाराचा खर्च चार हजारांपेक्षा अधिक झाला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधींचा तुटवडा आहे. त्यामुळे पशुपालकाची आर्थिक परवड होत आहे. सर्वच औषधीची सोय करून दिलासा देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया बारुळ येथील पशुपालक बालासाहेब पा.कळकेकर  यांनी व्यक्त केली.

आजारी पशुधनाचे योग्य विलगीकरण करावे
लंपी स्कीन हा विषाणूजन्य आजार अनेक पशुधनाला झाला आहे. अंगावर फोड येणे, तोंडातून लाळ येणे, चारा न खाणे, ताप आदी लक्षणे या आजारात आहेत. बारूळ येथे  एक कँप घेतला आहे. बारूळ व शेकापूर येथील पशुधनाचे नमुने घेऊन नांदेड येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. सध्या दवाखान्यात बरीच औषधी उपलब्ध आहेत. परंतु उपलब्ध नसलेली औषधी बाहेरून घेण्यास सांगितले असावे. पशुपालकांनी इतर पशुधनाला संसर्ग होऊ नये यासाठी आजारी पशुधनाचे योग्य विलगीकरण करून खबरदारी घ्यावी
- एस.एल.खुणे, पशुधन विकास अधिकारी, कंधार

Web Title: Crisis on cattle; ‘Lampy skin’ disease now causes ‘physical distance’ even in domestic animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.