तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:03+5:302021-08-01T04:18:03+5:30
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. तर तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. त्यात वातावरणातील ...
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. तर तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. त्यात वातावरणातील बदलामुळे साथीचे राेगही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. साधा तापही अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.
तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंतच्या दोन लाटेत वयोवृद्ध आणि तरुणांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे प्रशासनाने तिसऱ्या लाटेत बालकांसाठीच्या आरोग्य सुविधात वाढ केली आहे.
ताप आला म्हणजे कोरोना असे नाही, पण...
लहान मुलांना ताप आला म्हणजे कोरोना झाला असे नाही; परंतु कोरोनाची लक्षणे ही असू शकतात. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून वातावरणातही बदल जाणवत आहे. त्यामुळे अनेकवेळा इतर कारणामुळे लहान मुलांना ताप किंवा सर्दी हाेऊ शकते. अशावेळी उपचारासाठी विलंब केल्यास धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोविड केअर सेंटर
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने पाचशे खाटांचे रुग्णालय तयार केले आहे. जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात अशा बालकांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी साहित्य खरेदीही करण्यात आली आहे.