नुकसानग्रस्त पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:38 AM2019-05-18T00:38:44+5:302019-05-18T00:41:18+5:30
नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे उष्ण हवामानामुळे तीन एकर केळी पीक करपून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १६ मे रोजी प्रकाशित होताच नांदेड कृषी विभागाने तातडीने केळी पिकांची पाहणी केली व शेतक-याला नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला.
मालेगाव : नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे उष्ण हवामानामुळे तीन एकर केळी पीक करपून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १६ मे रोजी प्रकाशित होताच नांदेड कृषी विभागाने तातडीने केळी पिकांची पाहणी केली व शेतक-याला नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला.
शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपासून उष्णतेने उच्चांकी गाठली आहे. या उष्णतेचा परिणाम आता शेती पिकांवर होऊन शेतक-यावर नवे संकट उभे राहिले आहे. नांदुसा येथील शेतकरी गणेश तुकाराम जनकवाडे व मारोती तुकाराम जनकवाडे यांनी तीन एकर शेतीमध्ये केळीची लागवड केली आहे. त्यांच्या शेतात केळी उत्पादनास मुबलक पाणी उपलब्ध आहे. परंतु उष्णतेमुळे तीन एकरमधील केळी करपून गेली आहे. शिवाय पाने फाटल्यामुळे केळीच्या घडांची वाढ खुंटून ते गळून पडत आहेत. सध्या बाजारात केळी पिकांना मोठी मागणी असून ऐन हंगामाच्या काळात जनकवाडे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याकडे कृषी विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले होते.
या बाबतच्या नुकसानीचे वृत्त १६ मे रोजी प्रकाशित झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. त्याच दिवशी नांदेड कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक अश्विनी वासालकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसान झालेल्या केळी पिकांची पाहणी केली व नुकसानीचा अहवाल पीक विमा कंपनीकडे पाठविला आहे.
पिकांची पाहणी गरजेची
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे अनेक तालुक्यातील केळी, संत्रा, मोंसबी, डाळींबाच्या बागा सुकल्या आहेत़ अनेक वर्षांपासून जगविलेली झाडे अचानक करपत असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे़ त्यामुळे सर्वच ठिकाणी पाहणी करण्याची गरज आहे़
नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे प्रखर उष्णतेमुळे केळीचे नुकसान झाले. उष्ण हवामानामुळे पाने फाटून केळीची वाढ होत नाही. यामुळे केळीचे घडही गळून पडत आहेत. नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला आहे -अश्विनी वासालकर, कृषी सहायक, नांदेड