‘सीआरपीएफ’मुळेच देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत : अमित शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 05:34 PM2021-09-17T17:34:13+5:302021-09-17T17:36:25+5:30
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीआरपीएफ कॅम्प मुदखेड येथे १ काेटीव्या वृक्षाचे राेपण केले
नांदेड : देशातील एकूणच वातावरण पाहता केंद्रीय राखीव पाेलीस दलाच्या जवानांशिवाय अंतर्गत सुरक्षा मजबूत राहू शकत नाही, किंबहुना तशी कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी केले. ते शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये ( CRPF Camp ) आयाेजित ‘अखिल भारतीय वृक्षाराेपण अभियान-२०२१’ या कार्यक्रमात जवानांना मार्गदर्शन करताना बाेलत हाेते.
सीआरपीएफच्या मुदखेड कॅम्पमध्ये अमित शहा यांच्या हस्ते एक कराेडव्या वृक्षाचे राेपण आज दुपारी करण्यात आले. यावेळी शहा म्हणाले, देशांतर्गत सुरक्षेचा काेणताही प्रश्न निर्माण झाला की, सर्वप्रथम आठवण येते ती सीआरपीएफ जवानांची. सीआरपीएफ जवानांशिवाय देशाच्या अंतर्गत सुरक्षेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. गेल्या सात वर्षांत सीआरपीएफच्या २ हजारपेक्षा अधिक जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच आज देश सुरक्षित असल्याचे शहा यांनी सांगितले.
शहा म्हणाले, केंद्रीय सुरक्षा बलाने २ काेटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. दाेन वर्षांपासून हा कार्यक्रम राबवला जात आहे. यावर्षी ९९ लाख ९९ हजार ९९९ रोपांची लागवड करण्यात आली असून, १ काेटीव्या क्रमांकाचे रोप मी मुदखेड येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये लावताेय, ही माझ्या आनंदाची व गाैरवाची बाब आहे. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा वाढदिवस, निजामाच्या जुलमी शासनातून मराठवाडा व तेलंगणाची मुक्तता झाल्याचा सुवर्ण दिवस व गुरू गाेविंदसिघांची पावन भूमी. त्यामुळेच मी नांदेड जिल्ह्याची १ काेटीव्या वृक्ष लागवडीसाठी निवड केल्याचे शहा यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर, सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंग हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी अमित शहा यांचा गुरूद्वाराचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
शहिदांचे बलिदान देश विसरणार नाही
१७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन आहे. निजामांच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गाेविंदभाई श्राफ, दिगांबर पाटील आदींनी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे सांगत सुरक्षा दलाकडून मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व शहिदांना अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी हे ऑपरेशन यशस्वी करून देशाच्या स्वातंत्र्यानतर १३ महिन्यांनी मराठवाड्याला निजामांपासून मुक्तता मिळवून दिल्याचे स्मरणही अमित शहा यांनी यावेळी करून दिले.