पालम-लोहा महामार्गावर क्रुझर-कारचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 05:21 PM2021-12-26T17:21:19+5:302021-12-26T18:03:09+5:30
अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
पालम(परभणी): क्रुझर आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. 26 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गावरील पेठशिवनी येथे अपघात घडला. पालमवरुन नांदेडकडे (एमएच-04 इटी-2734 )क्रमांकाची कार लोह्याकडे जात होती. या कारची लोह्याकडून पालमकडे येणाऱ्या (एमएच-22एमएच- 6333) क्रमांकाच्या क्रूजरसोबत अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पेठशिवणी परिसरात या दोन्ही गाड्यांची भरधाव वेगात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील चार पैकी तिघे जागीच ठार झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे, फौजदार विनोद साने यांच्यासह आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी पोलिसांनी इतर लोकांच्या मदतीने जखमींना वाहनाबाहेर काढले. त्यांना सध्या पालम येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी पाठवून दिले. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यामुळे मयतांना वाहनाबाहेर काढणे ही मुश्किल झाले होते. मयताच्या शरीरात कारचे पार्ट घुसले होते. अपघातातील मयतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.