आरोपी हिमाचल पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:53 PM2017-11-17T23:53:35+5:302017-11-17T23:53:41+5:30
पंधरा लाख रुपयांत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देतो असे आमिष दाखविणाºया आरोपी सचिन राठोड याला शुक्रवारी सायंकाळी हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पंधरा लाख रुपयांत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देतो असे आमिष दाखविणाºया आरोपी सचिन राठोड याला शुक्रवारी सायंकाळी हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ अधिक चौकशीसाठी ते सचिन राठोड याला शनिवारी हिमाचलला घेवून जाणार आहेत़ दरम्यान, या प्रकरणात नांदेड पोलिसांनी आरोपीवर आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे़
पंधरा लाख रुपयांत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देण्याचे आमिष दाखविणाºया आरोपी सचिन राठोड याला नांदेड पोलिसांनी अटक केली होती़ सचिन राठोड याने नांदेड महापालिकेत जवळपास ३० उमेदवारांना मेसेज पाठविले होते़ त्यानंतर झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतही तेथील अनेक उमेदवारांना मेसेज पाठवून काही जणांशी संपर्कही साधला होता़ या प्रकरणात आरोपी सचिन राठोड याच्याविरोधात शिमला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ नांदेड पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आरोपी सचिन याने संपर्क साधलेल्या काही उमेदवारांचीही चौकशी करण्यात आली़
त्यासाठी नांदेड पोलीस महापालिकेतही पोहोचले होते़ दरम्यान, आरोपी सचिन राठोड याने उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी वापरलेले सीम हे त्याने इस्लापूर येथील एका मच्छीमाराचे चोरले असल्याचे उघडकीस आले़ त्यानंतर त्याला इस्लापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते़ त्या ठिकाणी त्याच्यावर चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला़ या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़
शनिवारी त्याला तपासासाठी हिमाचलला नेण्यात येणार आहे़ दरम्यान, आरोपी सचिन राठोड याला ईव्हीएमबाबत बरेचसे ज्ञान असून त्याच्यावर आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला असल्याची माहिती स्थागुशाचे पोनि़ संदीप गुरमे यांनी दिली़