खासदार चिखलीकरांच्या पार्टीत आमदारांचा 'डबा गुल'; अमित शाह जाताच पुन्हा सवता सुभा

By शिवराज बिचेवार | Published: June 17, 2023 06:39 PM2023-06-17T18:39:40+5:302023-06-17T18:40:32+5:30

गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकांना आमदार आणि निष्ठावंतांनी पाठ फिरविली होती.

'Daba Gul' of MLAs in MP Prataprao Chikhlikar's party; As soon as Amit Shah leaves distance again | खासदार चिखलीकरांच्या पार्टीत आमदारांचा 'डबा गुल'; अमित शाह जाताच पुन्हा सवता सुभा

खासदार चिखलीकरांच्या पार्टीत आमदारांचा 'डबा गुल'; अमित शाह जाताच पुन्हा सवता सुभा

googlenewsNext

नांदेड : जिल्हा भाजपमध्ये सर्व कारभार मित्रमंडळींकडूनच चालविण्यात येत असल्यामुळे आमदार, पदाधिकारी आणि निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे. परंतु पार्टी विथ डिफ्रंट असलेल्या भाजप पक्षश्रेष्ठीकडे त्यांचे काही चालत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यावाचून त्यांच्यापुढे पर्याय नाही. आठ दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाला. या दौऱ्यात एकमेकांसोबत दिसत असलेल्या या मंडळींनी शाह माघारी फिरताच पुन्हा सवता सुभा मांडला. त्याचाच प्रत्यय शुक्रवारी नायगाव तालुक्यातील कुंटूर झालेल्या डबा पार्टीत आला. 

खासदार प्रतापराव चिखलीकरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्याच मतदारसंघातील आमदारांचा डबा मात्र गुल करण्यात आला. गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकांना आमदार आणि निष्ठावंतांनी पाठ फिरविली होती. भाजपत सुरू असलेल्या एककल्ली कार्यक्रमावर जाहीर टीका करण्याची सोय नसली तरी अंतर्गत धुसफूस मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आमदारांच्या अनुपस्थितीबाबत प्रवीण दरेकर यांनीही वरिष्ठांना कळवणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर शाह यांच्या दौऱ्यात लोक जमविण्याची जबाबदारी या आमदारांवर देण्यात आली होती, तर दुसरीकडे नांदेडसह इतर जिल्ह्यांतील नेत्यांनाही टार्गेट होते. त्यामुळे सभा स्थळ खचाखच भरले होते. 

या सभेत जिल्ह्यातील भाजपत एकजूट असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. परंतु शाह परत जाताच सर्वांनी आपापली तोंडे फिरविली. सध्या भाजपकडून महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आमदार राजेश पवार यांच्या नायगाव मतदारसंघातील कुंटूर येथे डबा पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी बॅनरबाजी करून मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात व्यासपीठावरील बॅनरवरून आमदार राजेश पवार यांचे छायाचित्र आणि नाव गायब होते. भाषणात उपस्थितांनी त्यांचा साधा उल्लेख करण्याचेही टाळले. 

विशेष म्हणजे व्यासपीठावर खासदार प्रतापराव चिखलीकर, राजेश कुंटूरकर, श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार, रुपेश कुंटूरकर ही मंडळी होती. या प्रकारामुळे आमदार पवार समर्थकही बुचकळ्यात पडले. ही डबा पार्टी भाजपची, की केवळ चिखलकरांची? असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे भाजपत उघडपणे पडलेले हे गट-तट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या पथ्यावर पडणार, हे मात्र नक्की.

भाजप बदलल्याची निष्ठावंतांची खंत
भाजप हा दीर्घ संघर्षातून सत्तेपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षात सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या जात होत्या. राज्य पातळीवरील नेते प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत संपर्कात होते. परंतु आता ती परिस्थिती पक्षात राहिली नाही. जिल्ह्यातील एक-दोन नेते म्हणतील तेवढेच पक्षश्रेष्ठी ऐकत आहेत. यामध्ये सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना काडीचीही किंमत राहिली नाही, अशी खंत निष्ठावंतांनी व्यक्त केली.

Web Title: 'Daba Gul' of MLAs in MP Prataprao Chikhlikar's party; As soon as Amit Shah leaves distance again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.