धक्कादायक! १४ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन
By प्रसाद आर्वीकर | Published: July 28, 2023 03:43 PM2023-07-28T15:43:37+5:302023-07-28T15:43:56+5:30
अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
- बालाजी नागसाखरे
माळाकोळी ( जि. नांदेड): एका १४ वर्षीय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना लोहा तालुक्यातील माळेगाव येथे २३ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वाती त्र्यंबक वाघमारे (१४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथील अल्पभूधारक शेतकरी त्र्यंबक वाघमारे यांना पाच मुली व एक मुलगा असे आपत्य आहेत. कोरडवाहू शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला जातो. त्यांच्या तीन मुलींचे लग्न झाले असून, दोन मुलींचे लग्न झालेले नाही. त्यापैकी स्वाती वाघमारे ही सगळ्यात लहान मुलगी, नववी वर्गात शिकणारी स्वाती अभ्यासात हुशार होती. ती घर कामातही मदत करीत होती. दर रविवारी खंडोबा मंदिरात भाविकांसाठी अन्नदान असते. स्वाती त्या दिवशी मंदिरात गेली, त्या ठिकाणी जेवण केले, तेथे भांडे धुण्यासाठी मदत करून काही अन्न तिने घरी देखील आणले. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली; परंतु रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. शोध घेतला असता गावाशेजारी असलेल्या एका पळसाच्या झाडाला तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.