दररोज पैशामध्ये होणारी पेट्रोल, डिझेल दरवाढ सामान्यांच्या खिशाला रूपयांत कात्री लावणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:18+5:302021-01-18T04:16:18+5:30
नांदेड जिल्ह्यात जवळपास १७० पेट्रोल पंप आहेत. यामध्ये भारत पेट्रोलियम, इसार पेट्रोलियम, एपी, रिलायन्स आदी कंपन्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय ...
नांदेड जिल्ह्यात जवळपास १७० पेट्रोल पंप आहेत. यामध्ये भारत पेट्रोलियम, इसार पेट्रोलियम, एपी, रिलायन्स आदी कंपन्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बॅरलच्या किंमतीत घट झाली आहे. डाॅलरमध्ये मिळणारे बॅरल आज कमी किंमतीत मिळत असतानाही पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याऐवजी दररोज दहा ते वीस पैशांनी दररोज वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढ करण्यासंदर्भात त्या त्या राज्यांना स्वायत्ता देण्यात आली आहे. परंतु, महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत ग्राहकांचा विचार न करता महसूल वसुल करण्याचा सपाटा लावला आहे. नांदेड जिल्ह्यातील दरापेक्षा शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातील पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत. त्यामुळे शासनाने लावलेले विविध कर कमी करून ग्राहकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
चौकट
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असताना आज ग्राहकांना त्याचा फायदा न देता सरकार त्यांची तिजोरी भरण्याचे काम करत आहे. कोरोनामुळे प्रत्येक कुटुंबास फटका बसला आहे. शासनाने विविध कर रद्द करून पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा.
- संदीप पावडे, ग्राहक
पेट्रोल, डिझेल दरवाढ शासनाने लक्ष घातले तर कमी होवू शकते. आज केंद्र, राज्य शासन वेगवेगळा टॅक्स घेते. तसेच व्हॅट आणि एक्साईज ड्युटी, वाहतूक खर्च असा मिळून जवळपास ५० रूपयांचा अधिकचा भार ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ही लुट थांबवावी.
- गणेश सूर्यवंशी, ग्राहक
बॅरलच्या किंमतीत घट झाली असली तरी आपल्याकडे पेट्रोल, डिझेलवर लावले जाणारे विविध कर रद्द केलेले नाहीत अथवा कमी केलेले नाहीत. पेट्रोल, डिझेलवर ४० ते ५० रूपये प्रतिलिटर टॅक्स असून तो शासनाला जातो. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती वाढत राहणार. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने व्हॅट, कर कमी करणे गरजेचे आहे.
- सतीश किन्हाळकर, अध्यक्ष, पेट्रोलपंप डिलर असोसिएशन,
शहरात ऑटोरिक्षा चालविण्याचे काम करतो. परंतु, दररोज होणारी वाढ ही लक्षात न येणारी आहे. मागील काही दिवसात पेट्रोलचे दरवाढ होवून आज ९३ रूपये प्रतिलिटरने पेट्रोल घेवून पॅसेंजर करणे अवघड आहे. ग्राहकांना आम्ही केलेली वाढ पटत नाही.
- चंद्रकांत रहाटकर, चालक
शासनाने पेट्रोलवर लावलेले शेतकरी टॅक्स रद्द करून दोन रूपये पेट्रोल स्वस्त करावे, शेतकरी टॅक्स प्रत्यक्षात शेतकर्यांच्या हितासाठी वापरला जातो का याचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे विनाकारण शेतकर्यांच्या नावावर हाेणारी वसुली थांबवावी.
- रावसाहेब जाधव, ग्राहक
काळीपिवळीच्या तिकिटात वाढ
पेट्रोल, डिझेल दरवाढ दहा, वीस पैशात होत आहे. परंतु, त्याचा फटका हा रूपयांमध्ये होत आहे. नांदेड ते वसमत पूर्वी २० रूपये भाडे होते. ऑटो, काळीपिवळीचे भाडे वाढले असून प्रति पॅसेंजर ४० ते ५० रूपये भाडे आकारले जात आहे. त्यात दरवाढीमुळे परवडत नाही, असे सांगत क्षमतेपेक्षा अधिक पॅसेंजरचा भरणा केला जातो.
लांब पल्ल्याला जाणार्या बससह खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिट दरात वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी नांदेडातून खासगी ट्रॅव्हल्स धावतात. पुण्यासाठी पूर्वी साडेतीन ते पाचशे रूपये आकारले जात होते. आज त्यात वाढ करून ५०० ते १२०० रूपये आकारले जात आहेत.