डांबरातील आरोपी नांदेडातच ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:54 AM2018-12-17T00:54:52+5:302018-12-17T00:55:54+5:30
राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या डांबर घोटाळा प्रकरणात पकडलेल्या दोन आरोपींना जामीन मिळाला आहे़ परंतु, या प्रकरणातील तिघे अद्यापही फरारच आहेत़
नांदेड : राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या डांबर घोटाळा प्रकरणात पकडलेल्या दोन आरोपींना जामीन मिळाला आहे़ परंतु, या प्रकरणातील तिघे अद्यापही फरारच आहेत़ फरार असलेले हे आरोपी जामिनासाठी प्रयत्न करीत असताना ते नांदेडातच मुक्तपणे वावरत असल्याची माहिती हाती आली आहे़ त्यामुळे पोलिसांना ही बाब खरेच माहिती नाही काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़
कोट्यवधी रुपयांच्या डांबर घोटाळ्यात बांधकाम विभागाचे संदीप कोटलवार यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर ठाण्यात सुरुवातीला सहा कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता़ त्यातील भास्कर कोंडा आणि मनोज मोरे या दोघांना सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती़ तेव्हापासून ते तुरुंगातच होते़ त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे़
या गुन्ह्याला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असताना अद्यापही उर्वरित तीन आरोपी मात्र पोलिसांना सापडलेच नाहीत.विशेष म्हणजे, हे आरोपी जामिनासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी नांदेडातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या ते संपर्कात असल्याची माहिती हाती आली आहे़ हे आरोपी खुलेआम शहरात फिरत असताना याची माहिती पोलिसांना नाही हे आकलनापलीकडचे आहे़ दरम्यान, न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे़ त्यामध्ये ४१ साक्षीदारांची नावे आहेत़ परंतु या प्रकरणात नांदेडातील बडे कंत्राटदार, डांबर पुरवठा करणारा यासह घोटाळ्याला पाठबळ देणारे अधिकारी मात्र नामानिराळेच आहेत़