आदिवासी संस्कृतीमधील दंडार लोकनृत्याची लोकप्रियता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 04:40 PM2018-11-07T16:40:10+5:302018-11-07T16:41:07+5:30
आदिवासी संस्कृती संवर्धनाबरोबर समाज जोडणाऱ्या दंडार या लोकनृत्याची लोकप्रियता माहिती तंत्रज्ञान युगात आजही टिकून आहे.
श्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) : आदिवासी संस्कृती संवर्धनाबरोबर समाज जोडणाऱ्या दंडार या लोकनृत्याची लोकप्रियता माहिती तंत्रज्ञान युगात आजही टिकून आहे.
सद्य:स्थितीला मनाला भुरळ घालणारी मनोरंजनाची व समाज प्रबोधनाची साधने घरोघरी पोहोचली आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. माहिती तंत्रज्ञान युगात नवी क्रांती झाली. तरीही आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या दंडार लोकनृत्याची आवड आजही पूर्वीसारखीच आहे. विजयादशमीदिनी समाजप्रमुख म्हणजे, महाजनांच्या घरी समाज बांधवांची बैठक घेतल्या जाते. तेव्हा दंडार हे लोकनृत्य बसविण्याचा निर्णय होतो. दसरा ते दिवाळी या कालावधीत दररोज सायंकाळी महाजनांच्या दरबारी या नृत्याची तालीम घेण्यात येते.
विरंगुळा व मनोरंजन म्हणून हौसे-नवसे येथे हजेरी लावून उत्साह द्विगुणित करतात. माहितीगार व जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पात्र वठविणाऱ्या कलाकारांची निवड केली जाते. २० ते २५ कलाकार यात सहभाग नोंदवितात. या तालमीत कौटुंबिक कलह, किरकोळ वाद, रुसवेफुगवे ही कटुता नाहीशी होते. समाजात एकतेचे निकोप वातावरण तयार होते. वाद्य संगीतासाठी ढोल, ढोलकं, तुडमुडी, बासरी, डफ, मृदंग, घुंगरू, टाळ आदी साहित्याचा वापर केला जातो.
उपजत कलागुणांची आदान प्रदान व्हावी व कलागुणांना वाव मिळून समाज जोडल्या जावा म्हणून पाहुणे बनून कलाकार मंडळी आजूबाजूंच्या गावात जाऊन मनोरंजन करण्याची परंपरा आहे. दिवाळीनंतर समारोप करताना गोळा झालेल्या मिळकतीतून गावात स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात येतो.
कामधंदा, नोकरी किंवा शिक्षणासाठी शहरी संस्कृतीत वाढणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना गाव-खेड्यातील आपली संस्कृती दिवाळीनिमित्त गावात आल्यावर दंडार या लोकनृत्याच्या माध्यमातून पहावयास मिळते. त्यांच्या मुलाबाळावर याचे चांगले संस्कार होतात म्हणून, दंडार लोकनृत्याची लोकप्रियता टिकून असल्याचे मत आदिवासी विद्यार्थी कृती समिती म.रा.चे अध्यक्ष विकास कुडमेते, शिक्षक देवराव आरके, माजी सरपंच सुनीता सिडाम यांनी व्यक्त केले.
गाण्याच्या बोलावर व वाद्याच्या ठेक्यावर चाल धरून कलावंत टिपरी नृत्य, समूहनृत्य, घुसाडीनृत्य सादर करतात. या नृत्याचे खास आकर्षण हे घुसाडी असते. तो मानवी चेहरा कोरलेला लाकडी टोप किंवा मोरपंखापासून बनविलेला मुकुट परिधान केलेला असतो. घर अंगणात येताच महिला वर्ग घुसाडीचे औक्षण करून सोपस्कार उरकून घेतात. विशेष म्हणजे, गोंडी बोलीभाषेत संवाद साधून समाजप्रबोधनाचे छोटे मोठे किस्से सादर केले जातात. तसेच नृत्य साजरे केले जाते.