दांडियाचा वाद ; दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:05 AM2018-10-20T01:05:20+5:302018-10-20T01:05:48+5:30
गोकुळनगर भागातील दुर्गा मंडळासमोर सुरु असलेल्या महिलांच्या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या कारणावरुन दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणात दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गोकुळनगर भागातील दुर्गा मंडळासमोर सुरु असलेल्या महिलांच्या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या कारणावरुन दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणात दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे़
१८ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोकुळनगर येथील दुर्गोत्सव मंडळाजवळ महिलांचा दांडिया सुरु होता़ यावेळी शेजारील इमारतीवरुन काही जण या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते़
याबाबत अजय नागनाथ गोपीवाड यांनी त्यांना जाब विचारला असता बंडू सोनसकर, व्यंकट मुदीराज, खदीर, गोपी मुदिराज, रोहित मुदीराज, राज मुदिराज, शेख बबूल वजीर शेख, करण रमेश वाघमारे व इतर १० ते १५ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमा करीत लाठ्या-काठ्या अन् तलवारीने अजय गोपीवाड यांच्यावर हल्ला केला़ या प्रकरणाचा तपास पोउपनि कांबळे हे करीत आहेत़
तर याच प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे़ व्यंकट मुदिराज हे आपल्या इतर मित्रांसह इमारतीच्या छतावर काम करीत असताना आरोपी अजय गोपीवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्याला चार ते पाच वेळेस फोन केला़ त्यानंतर फोन का उचलला नाही असे म्हणून वाद घालत मारहाण केली़ या प्रकरणी अजय गोपीवाड, रवी गोपीवाड, कृष्णा गोपीवाड, साई दिनकर पाटील, राहुल उचलवार, नरेश भारकाला, विठ्ठल गोपीवाड यांच्यासह इतर ५ ते १० जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोउपनि भोसले या करीत आहेत़